किरणच्या चाहत्यांना आवडतेय किरणने साकारलेली विदर्भातील अवनी
अभिनेत्री किरण ढाणे हिने छोट्या पडद्यावर उत्तम काम करुन सर्वांची मनं जिंकली आहेत. मग ती भूमिका खलनायिकेची असो किंवा तडफदार पोलिस तरुणीची प्रमुख भूमिका असो. ती प्रेक्षकांची सर्वात फेव्हरेट अभिनेत्री बनली आहे. ‘एक होती राजकन्या’ या मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच झाला आणि त्यातून किरणने साकारलेली अवनी भोसले ही प्रेक्षकांना खास आवडली. अवनी ही मूळची नागपूरची असल्यामुळे तिच्या बोलण्यात नागपूरी भाषेचा वापर खूपच जास्त आहे आणि तिच्या तोंडी नागपूरी भाषा किती गोड वाटते याविषयी तिचे कौतुक तिच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर केले आहे.
किरणच्या नागपूरी भाषेचं सोशल मिडीयावर होतंय खास कौतुक
बाबांची राजकन्या म्हणजे ‘एक होती राजकन्या’ मालिकेतील अवनी भोसले हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ झालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोनी मराठीवरील या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून मालिकेप्रती आणि किरणला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते फारच उत्सुक होते. मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि किरणने हटक्या पध्दतीने सर्वांना इम्प्रेस केलं. ‘विदर्भाची भाषा बोलून राहिलं १ नं’, ‘आतुरता पुढील एपिसोडची’, ‘कमाल अभिनय’, ‘सुंदर हास्य’ यांसारखे अनेक स्पेशल कमेंट्स किरणच्या चाहत्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून किरणपर्यंत पोहचवल्या आहेत.
‘कसा वाटला पहिला एपिसोड?’ किरणने विचारताच चाहत्यांनी केला कौतुकांचा वर्षाव
अभिनेत्री किरण ढाणेची ‘एक होती राजकन्या’ ही सोनी मराठीवरील मालिका नुकतीच सुरु झाली असून सोशल मिडीयावर पहिल्या एपिसोडवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. ‘कसा वाटला पहिला एपिसोड?’ एवढंच किरणने विचारल्यावर तिच्या चाहत्यांनी मात्र तिच्या नागपूरी भाषेचे, तिच्या अभिनयाचे, सुंदर हास्याचे आणि नवीन भूमिकेचे तोंडभरुन कौतुक केले आहे. नागपूरी भाषेचा गोडवा वाढवणा-या अवनीचा पुढील प्रवास पाहण्यासाठी चाहते पुढील एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत असेही त्यांनी सांगितले.