Marathi News
‘रिअल’ मधील ‘ऋचा’ झाली ‘रिल’ मध्ये ‘परी’
ऋचा इनामदार ही सुंदर आणि बहुगुणी अभिनेत्री आहे. व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच ‘भिकारी’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या नायिकेची भूमिका ऋचाने केली. डेन्टिस्ट्री करतानाही ऋचाला असलेली अभिनयाची आवड तिने जपत अभिनयाला सुरुवात केली. फक्त तिच्यातील प्रतिभेच्या जोरावर तिने स्वतःचे या क्षेत्रातले स्थान मजबूत केले. ऋचा अतिशय सक्षम अभिनेत्री आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ऋचाने या क्षेत्रात तिच्या अभिनयाची एक वेगळी छाप पाडली. अनेक विविध भाषिक भूमिका तिने चित्रपटांमध्ये साकारल्या आहेत. ऋचाच्या अभिनयाची सुरुवातच आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित ‘फिचर फिल्म्स’ने झाली. याशिवाय अनेक मोठ्या कलाकारांसोबत नामवंत ब्रँड्सच्या सुमारे पन्नास पेक्षा जास्त जाहिरातीत ती झळकली.
आता ऋचा ‘वेडिंग चा शिनेमा’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘भिकारी’ सिनेमानंतर ऋचाने ‘वेडिंग चा शिनेमा’ हा चित्रपटचं का निवडला यावर ऋचा सांगते, ” ‘भिकारी’ चित्रपटानंतर मधल्या काळात मी विविध जाहिराती, काही शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीज मध्ये काम केलं. त्या वेबसिरीज आणि शॉर्टफिल्म्स गाजल्या त्यांचे विविध स्तरांवर कौतुकही झाले. मला मराठीमध्ये अनेक ऑफर्स आल्या पण, एक अभिनेत्री म्हणून मला एकाच भूमिकेत अडकून पडायचे नव्हते. अभिनयात मला स्वतःलाच आजमावून पाहायला आवडते. म्हणून मी स्वतःवर भाषेचं बंधन ठेवलं नाही. मला प्रत्येक भूमिका ही पहिल्या भूमिकेपेक्षा वेगळी करायची होती. मराठीत काम करताना जे सुख मिळतं ते कुठेच मिळत नाही. मराठीमध्ये असलेले कथानक, विषय हे खरंच खूपच प्रगल्भ आणि सुंदर असतात, आणि मराठी रसिकांना चित्रपट समजतात. जेव्हा मला या ‘वेडिंग चा शिनेमा’ चित्रपटाबद्दल विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार दिला. चांगला विषय, नावाजलेले सहकलाकार, आणि कलेची उत्तम जाण असलेले एक संवेदनशील दिग्दर्शक असल्यामुळे मी नाही म्हणूच शकले नाही. मला पुढे सुद्धा चांगले विषय असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये करायचे आहे”.
लवकरच ऋचा तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित बीबीसीच्या ‘क्रिमिनल जस्टीस’ या वेबसिरीज मध्ये दिसणार आहे.