Marathi News

प्रियांका चोप्रा, राजेश मापुसकर आणि आशुतोष गोवारीकर यांचा मराठमोळा नजराणा व्हेंटिलेटर झी स्टुडिओजची रसिकांना दिवाळी भेट

jitendra-joshi-rajesh-mapuskar-and-ashutosh-gowariker-nikhil-sane-at-the-trailer-launch-event-of-marathi-film-ventilator

 कुटुंबात ज्याप्रमाणे प्रेम, आपुलकी, माया या गोष्टी असतात त्याचप्रमाणे रुसवे-फुगवे, राग लोभ आणि हेवेदावे ही आपसुकच येतात. एकत्र कुटुंबपद्धती ही जरी आपली संस्कृती असली तरी बदलत्या काळात ती सुद्धा बदलत चालली आहे. आज कुटुंबे विभक्त झाली असली तरी त्यांच्यातलं प्रेम संपलय असंही नसतं आणि अनेकदा एकत्र आले म्हणजे तिथे केवळ प्रेमच असतं असंही नसतं. शेवटी कुटुंब हे माणसांनीच बनतं आणि माणसाच्या स्वभावातले गुण त्यातही उतरणं स्वाभाविक असतंच.. अशाच एका कुटुंबाची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे व्हेंटिलेटर या चित्रपटामधून. एका घटनेमुळे एका जागी आलेलं कामेरकर कुटुंब आणि त्यातील सदस्यातून उलगडत जाणारे नात्यांचे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारीगोष्ट या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन मोठी नावे पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी एकत्र आली आहेत.

आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीतआपलं वेगळं स्थान निर्माण करणारी आजची आघाडीची अभिनेत्री बनलेली प्रियांका चोप्रा ‘व्हेंटीलिट’रमधून मराठी चित्रपटाच्या निर्मितीक्षेत्रात पदार्पण करत आहे हे विशेष. तर अनेक हिंदीचित्रपटांच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा असलेले आणि ‘फेरारी की सवारी’ सारखा हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजेश मापुसकर या चित्रपटामधून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. हिंदीमध्ये एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व्हेंटीलेटरमध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी अनेक मराठी चित्रपटामधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे आशुतोष या चित्रपटाद्वारे तब्बल अठरा वर्षांनी पुनरागमन करत आहेत. मागील वर्षी दिवाळीत ‘कट्यार काळजात घुसली’सारखा संगीतमय नजराणा देणा-या झी स्टुडिओजने यावर्षी ही नात्यांची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे.येत्या ४ नोव्हेंबरलाहा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक राजेश मापुसकर, निर्माती डॉ. मधू चोप्रा ,अभिनेते आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, अभिनेत्री सुलभाआर्या, उषा नाडकर्णी, सुकन्या मोने तसेच झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. मधु चोप्रा म्हणाल्या की, “प्रियांकाचा कायमच नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न असतो. ही निर्मिती सुद्धा तिचंच स्वप्न होता.प्रादेशिक सिनेमा मध्ये खास करून मराठीमध्ये चांगले प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांचाही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आमच्या निर्मितीच्या या पहिल्याच प्रयत्नाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा करते.”

दिग्दर्शक राजेश मापुसकर म्हणाले की, “व्हेंटिलेटर ही नात्यांची गोष्ट आहे.  यातील घटना आणि पात्र प्रत्येकाने कधी ना कधी तरी अनुभवली असतील अशीच आहेत त्यामुळे चित्रपट बघताना प्रेक्षक त्याच्याशी आपसुकच जोडला जाईल हा विश्वास आहे.  कुटुंबात आणि नात्यात हरवत चाललेल्या संवादाची गोष्ट मार्मिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल आशुतोष गोवारीकर म्हणाले की,” दिग्दर्शनात व्यस्त असताना पुन्हा कधी अभिनयाकडे वळेन असं कधीच वाटलं नव्हतं. परंतु यातील राजा कामेरकर या व्यक्तिरेखेसाठी मीच कसा योग्य आहे याबद्दलची खात्री राजेश मापुसकर बाळगुन होते. यासाठी त्यांनी खुप आग्रह केला आणि प्रियांकानेसुद्धा निर्माती म्हणून विश्वास दाखवला आणि मी ही भूमिका स्वीकारली.  मला या चित्रपटाची गोष्ट खुप आवडली. आता ट्रेलर पाहून तुम्ही जसे हसलात तसा मी देखील फिल्मची संहिता वाचताना हसत होतो! या फिल्मच्या निमित्ताने मला उषा नाडकर्णी, सुलभा आर्या आणि सतीश आळेकर यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करता आलं ही माझ्याकरता विशेष आनंदाची बाब होती.”

‘व्हेंटिलेटर’ची कथा आहे कामेरकर कुटुंबाची.  दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या वडिलोपार्जित घरात हा गणेशोत्सव साजरा करणारं हे कुटुंब. या गणेशाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच जोरदार चालू आहे आणि गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना कुटुंब प्रमुख ‘गजू काका’ कोमामध्ये जातात आणि त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात येते. इथूनच कामेरकर कुटुंबात गोंधळाला सुरुवात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच अमेरिकेतील कामेरकर कुटुंबही या हॉस्पीटलमध्ये धाव घेतात. आणि इथुन उलगडत जातो नात्यांचा एक अनोखा प्रवास. एका घटनेमुळं कामेरकर कुटुंब एकत्र येतं आणि त्यासोबतच एकत्र येतात या कुटुंबातील लोकांचे स्वभाव.. कुणाचा जिव्हाळा तर कुणाचा स्वार्थीपणा, कुणाचा आपलेपणा तर कुणाचा धूर्तपणा.. या सगळ्यांची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, संजीव शाह, सतीश आळेकर, अच्युत पोतदार, सुकन्या कुलकर्णी-मोने, सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, निखिल रत्नपारखी, नम्रता आवटे-सांभेराव, निलेश दिवेकर यांसह अनेक लोकप्रिय कलाकार या चित्रपटात बघायला मिळणार आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद राजेश मापुसकर यांचे असून छायाचित्रण सविता सिंह यांचे आहे. चित्रपटात दोन गाणी असून ती मनोज यादव आणि शांताराम मापुसकर यांनी लिहिली असून रोहन-रोहन या संगीतकार द्वयीने ती संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटाचं संकलन रामेश्वर भागवत यांनी केले आहे.येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button