Marathi News

प्रेमाची परिभाषा मांडणारा असेही एकदा व्हावे ट्रेलर प्रदर्शित

 ‘असेही एकदा व्हावे’ च्या सुमधुर गाण्यांची रंगली मैफिल

असेही एकदा व्हावे
असेही एकदा व्हावे


माणसाच्या जीवनात येणाऱ्या विविध नात्यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य ठरत असते. प्रत्येक नात्यातील कांगोरे आणि जबादारी पेलताना ‘असे हि एकदा व्हावे’ या आशेवर प्रत्येक व्यक्ती मार्गक्रमण करत असतो. नात्याच्या याच आशावादी पैलूंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘असे हि एकदा व्हावे’ हा सिनेमा लोकांसमोर येत आहे. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या मराठीच्या गुणी तसेच आघाडीच्या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा नुकताच मोठ्या दिमाखात ट्रेलर आणि म्युझिक लाँच करण्यात आला.


संपूर्ण स्टारकास्टच्या मांदियाळीत प्रदर्शित करण्यात आलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये, उमेश आणि तेजश्रीची लव्हकेमिस्ट्री आपणास पाहायला मिळते. शिवाय आर.जे. च्या भूमिकेत असलेल्या तेजश्रीचा मॉडर्न लुक तिच्या चाहत्यांना सुखद धक्का देणारा ठरत आहे. दोघांना वाटणारी प्रेमाची अनाहूत जाणीव आणि नाते स्वीकारण्यापूर्वीचे दडपण या ट्रेलरमध्ये दिसून येते.

शिवाय या दोघांबरोबरच शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील आणि कविता लाड व अजित भुरे या कलाकारांचीदेखील झलक आपल्याला यात पाहायला मिळते. या सिनेमाच्या ट्रेलरबरोबरच लाँच करण्यात आलेले ‘किती बोलतो आपण’ आणि ‘सावरे रंग मै’ ही दोन गाणीदेखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मराठीचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतदिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यांमधील ‘किती बोलतो आपण’ हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून त्याला कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. तर समीर सामंत लिखित ‘सावरे रंग मै’ हे गाणे सावनी शेंडे हिने गायले आहे. शिवाय ‘भेटते ती अशी’ या गाण्याने तसेच, ‘यु नो व्हॉट’ या कवितेने रसिकांच्या मनावर यापूर्वीच मोहिनी घातली आहे.


अवधुत गुप्ते ह्यांनी ह्या चित्रपटात एक रोमँटिक गाणं, एक गझल तर एक शास्त्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे.
त्यामुळे या सिनेमाच्या दर्जेदार ट्रेलरबरोबरच सुमधुर गाण्यांची मैफिलदेखील लोकांना या कार्यक्रमात अनुभवता आली.
प्रेमाची निखळ कथा मांडणा-या या सिनेमाची मधुकर रहाणे यांनी निर्मिती केली असून रविंद्र शिंगणें यांचे सहकार्य यात लाभले आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा हा सिनेमा येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button