Marathi News

नक्की पाहा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ ला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात

आयुष्यात जर सुरुवातीलाच एखादी चूक झाली असेल, तर ती चूक आयुष्यभर सोबत घेऊन चालायची का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. सध्याचा काळ बदलला आहे,  आणि त्यामुळे विचार करण्याची पध्दत सुध्दा बदलली आहे. आता लोकं आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर झालेली चूक सुधारुन नव्याने पुढे जाण्याची धमक दाखवतात. अशीच धमक आणि जिद्द गजेंद्र अहिरे यांच्या ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमातील ‘जया देशपांडे’ या पात्राने दाखवली आहे आणि ही भूमिका सई ताम्हणकरने साकारलेली आहे. सईसह या सिनेमात नीना कुळकर्णी, राजेश श्रृंगारपुरे, निखिल रत्नपारखी, बालकलाकार पियुश, अथर्व बेडेकर यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

नवीन जनरेशनच्या मुली नवीन चॅलेंजेस् स्विकारत आहेत आणि त्यांचा रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्या महत्त्वाकांक्षी आहेत, त्या बंडखोर आहेत. पण त्या स्वैर नाही. ‘जया देशपांडे’ ही सुंदर आणि बुध्दिमान आहे, तिचं असं म्हणणं आहे की, “माझ्याकडे उत्तम शरीर आहे, उत्तम मन आहे त्यासाठी मी मेहनत घेते. मग मी त्याचे लाड नको का करायला. आयुष्य मी भरभरुन जगायला नको का…?” आणि आयुष्य भरभरुन जगणं म्हणजे केवळ पुरुष, पैसा, पॉवर नाही. आयुष्य समृध्द कसे करता येईल याचा विचार करणारी ती स्त्री आहे. त्यासाठी तिने असे काही निर्णय घेतले ज्यामुळे तिचं आयुष्य बदलून जाऊ शकतं. नवीन काळाचे चॅलेंजेस आणि त्यामुळे होणारे परिणाम स्विकारण्याची हिंमत तिने दाखवली आहे. तसेच, तिला अजिबात असं वाटत नाही की ‘तिला कोणीतरी प्राधान्य द्यावं, तिचा विचार करावा, सहानुभूती द्यावी’. तिचं स्वत:चं अस्तित्व तिला जास्त महत्त्वाचं वाटतं. कोणाचीही साथ न घेता जयाला तिच्या मुलाला स्व:च्या पायावर उभं करायचंय, त्याला स्वाभिमानी बनवायचंय.

आई, मुलगी, बायको, प्रेयसी या सगळ्या नात्यांमध्ये जया अतिशय स्वाभिमानी आहे. स्वत:च्या भल्यासाठी ती बुध्दिचा वापर करते आणि त्यासाठी प्रामाणिक कष्ट घेते. ती टुडेज् वुमन आहे. पण या बदललेल्या टुडेज् वुमनच्या समोर अनेक प्रश्न निर्माण होतात की ‘तिच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, प्रेयसी, बायको, मुलगी की आई? केवळ स्वत:च्या आयुष्याचा विचार करत बसण्यापेक्षा माझ्या पोटातून जो जन्माला आला आहे त्याचं आयुष्य काय आहे?’

या सगळ्या गोष्टींवर आणि नवीन जनरेशनच्या नव्या विचारांवर हा सिनेमा फिरतो. याच आठवड्यात म्हणजेच २२ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. गजेंद्र अहिरेंचं दिग्दर्शन, त्यांची कथा, कलाकारांचा अभिनय, उत्तम गाणी यांमुळे या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार हे नक्की. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे. तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button