अनिकेत राजकुमार बडोले निर्मित, सायली संजीवची प्रमुख भूमिका असलेला ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

“माणसांनी केवळ कुटुंबापुरतं न जगता देशासाठी आणि समाजासाठी काही तरी केलं पाहिजे”, असा सुंदर विचार मांडणा-या ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या चित्रपटाची निर्मिती युगंधर क्रिएशन्सचे अनिकेत राजकुमार बडोले यांनी केली आहे.
मल्हार गणेश दिग्दर्शित आणि डॉ. सतिश (अतुल) सोनोने लिखित ‘दाह’ चित्रपटाची कथा कौटुंबिक आहे. एकीकडे संसाराची, कुटुंबाची गोष्ट आहे तर दुसरीकडे तरुण मुलांना पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्याची ओढ आहे. या चित्रपटात सायली संजीव, गिरीश ओक, राधिका विद्यासागर, सुह्रद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
या चित्रपटात सायली संजीवने ‘दिशा साने’ची भूमिका साकारली आहे. अतिशय धार्मिक आणि आदर्श वाटाव्यात अशा सौ. साने आणि सुप्रसिध्द डॉक्टर श्री. साने या सुखी जोडप्याची ही गोष्ट आहे. त्यांची मुलगी ‘दिशा’च्या येण्याने त्यांच्या संसारात सुख आणि आनंद नांदू लागते. दिशा ही त्यांची पोटची मुलगी आहे की दत्तक? जर दत्तक घेतली असेल तर तिचा स्वीकार आनंदाने केला जाईल का? अशा ब-याच प्रश्नांची उत्तरं या चित्रपटात मिळणार आहेत. तसेच, अनेक तरुणांना परदेशी शिक्षणाची फार ओढ असते. पण त्यापैकी काही असे ही असतात ज्यांना भारतात राहूनच आपल्या शिक्षणाचा वापर येथील लोकांसाठी, गावांसाठी सेवेच्या माध्यमातून करायचा असतो. समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करणारी ‘दिशा’ या महिन्यात तुम्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटातील गाण्यांना संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी संगीत दिले आहे गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेत. संगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, अनिरुध्द वानकर, बेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहे. पटकथा उन्मन बाणकर आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली आहे तर संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. उमेश शिंदे हे कार्यकारी निर्माते आहे.
‘दाह मर्मस्पर्शी कथा’ १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply