Marathi News

मोहित सूरीच्या ‘मलंग’मध्ये प्रसाद जवादे पोलिसाच्या भूमिकेत

Prasad Jawade
Prasad Jawade

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘असे हे कन्यादान’ ह्या मालिका आणि ‘मिस्टर अँन्ड मिसेस सदाचारी’, ‘गुरू’ अशा सिनेमांमधून झळकलेला अभिनेता प्रसाद जवादे ह्या आठवड्यात रिलीज होणा-या मोहित सूरी दिग्दर्शित ‘मलंग’ चित्रपटामध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ह्याअगोदर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘छिछोरे’ सिनेमामध्ये एका सीनमध्ये दिसलेला प्रसाद ‘मलंग’मध्ये मात्र महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. सूत्रांच्या अनुसार, मलंग सिनेमामध्ये साध्या वेशातल्या पोलिसांच्या भूमिकेत प्रसाद दिसणार आहे. सिनेमात तो गोव्यातला पोलिस असल्याने कोंकणी भाषा बोलताना दिसेल.

आपल्या भूमिकेच्या तयारीविषयी अभिनेता प्रसाद जवादे सांगतो, “सिनेमाचे कथानक वाचल्यावर मला लक्षात आले की, ह्यासाठी मला अधूनमधून अस्खलित कोंकणी बोलणे गरजेचे आहे. म्हणूनच मग मी माझ्या एका गोव्यातल्या मित्राकडून कोंकणी बोलायचे धडे गिरवले. माझे कोंकणी मधले संवाद व्यवस्थित बोलले जावेत, म्हणून शुटिंगवेळी आणि सिनेमाच्या डबिंगवेळीही मित्राला उपस्थित राहण्याचा आग्रह धरला. आणि मला आनंद आहे की, मोहितसरांनी माझ्या ह्या तयारीचे कौतुक केले.”

मोहित सूरीविषयी प्रसाद सांगतो, “त्यांना मराठी कलाकारांविषयी विशेष आदर आहे. ते खूप तल्लख दिग्दर्शक आहेत. सिनेमा बनवताना ते अतिशय बारकाईने काम करतात. दिशा पाटनी, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर ह्यांच्याच नाही तर छोट्यातल्या छोट्या अभिनेत्याच्या भूमिकेच्या लकबींचा सुध्दा ते बारकाईने विचार करतात. दिग्दर्शक जर एवढा समर्पित होउन काम करत असेल, तर अभिनेत्यांनाही सिनेमाकडे तेवढ्याच डेडिकेशनने काम करण्याची प्रेरणा मिळते.”

आदित्य रॉय कपूर, दिशा पाटनी, कुणाल खेमू ह्या कलाकारांशी मलंग दरम्यान प्रसादची मैत्री झाली. प्रसाद सांगतो, “हे सर्वच मोठे स्टार्स आहेत. त्यामूळे त्यांच्यासोबत काम करताना पहिल्यांदा खूप दडपण असायचे. पण जशी मैत्री होत गेली. तसेच दडपण आपसूकच कमी होऊ लागले. आदित्यसोबत तर नंतर शुटिंग दरम्यान क्रिकेटही खेळलोय.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button