Marathi News

ढोल ताशांच्या (Dhol Tashe) गजरात बेधुंद तरूणाई

ढोलावर पडणारी थाप म्हणजे शौर्याला घातलेली आर्त साद…चैतन्याला आलेलं उधाण…तरूणाईचा जल्लोष दाखवणारं एक अजब माध्यम….ताशांचा तडतडाट म्हणजे संघर्षमयी जीवनाला सातत्याने दिलेला लढा… आणि याच्याचं साक्षीने अविरत पडणारे टोले….अगदी घड्याळ्याच्या काट्यासारखे…वाजवणाऱ्या, बघणाऱ्या, ऐकणाऱ्या अगदी प्रत्येकाच्या मनातला आनंदोत्सव म्हणजे ‘ढोल ताशांचा गजर’…

ढोल ताशे पथकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कॉम्प्युटर गेमिंगच्या जमान्यात ढोल ताशांप्रती तरुणांचा उत्साह आजही कायम आहे. आपल्या दैनंदिन दिनक्रमांनंतर आपलं सादरीकरण उत्तम असावं यासाठी अहोरात्र हे तरूण झटत असतात. मात्र यांच्या मेहनतीला अगदीचं अत्यल्प मानधनात समाधान मानावं लागतं. याचं मेहनतीला, उत्साहाला, ओळख मिळवून देण्यासाठीचा लढा ‘ढोल ताशे’ या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. मार्केटींगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरूणाच्या नोकरीवर काही कारणास्तव गदा येते. त्यानंतर विरंगुळा म्हणून त्याचं ढोल ताशा पथकांकडे झुकणं…आणि या पथकांना ओळख मिळवून देण्यासाठी आपल्या मार्केटींगचं कसब वापरणाऱ्या तरूणाची ही कथा आहे.

ब्रम्हांडनायक मूवीज् प्रस्तुत ढोल ताशे या चित्रपटात अभिजीत खांडकेकर आपल्याला मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्या विरूद्ध एका वेगळ्या लूकमध्ये आपण जितेंद्र जोशीला पाहू शकणार आहोत. हिंदीतला ओळखीचा चेहरा म्हणजे ह्रषिता भट्ट या चित्रपटात आभिजीतच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अजून एका जोडीची भर पडणार आहे. शिवाय प्रदिप वेलणकर, इला भाटे, विनय आपटे यासारखे दिग्गज या चित्रपटात आहेत. राजकुमार अंजुटे आणि अतुल तापकीर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अंकुर काकतकर दिग्दर्शित ‘ढोल ताशे’ येत्या ३ जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button