Marathi News

ग्लॅमरस अंदाजातल्या सई, ललित, पर्णचा ‘मीडियम स्पाइसी’ झळकणार 5 जूनला !

Medium Spicy

 

सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे ह्यांचा हा चित्तवेधक स्टाइलिश आणि ग्लॅमरस अंदाज आहे, त्यांच्या ‘मीडियम स्पाइसी’ ह्या आगामी सिनेमासाठी नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधला. डोळ्यांना व्हिजुअल ट्रिट देणा-या ह्या फोटोमूळे आता ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची उत्सुकता अजून ताणली गेलीय.

ह्या लक्षवेधी फोटोसोबतच मीडियम स्पाइसी सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केलीय. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तूत, विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाइसी’ 5 जून 2020ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

ह्या चित्ताकर्षक फोटोसोबतच चित्रपटाची तारीख घोषित करण्याविषयी निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “सई, ललित आणि पर्ण ह्यांच्यातली केमिस्ट्री सिनेमाच्या आणि फोटोशूटच्या चित्रीकरणावेळीही आम्हांला जाणवली आणि त्यांच्यातल्या केमिस्ट्रीची हिचं झलक ह्या फोटोतूनही प्रतीत होतेय. एखादा पदार्थ चविष्ट व्हायला जशी पदार्थांची योग्य प्रमाणात भट्टी जमणे गरजेचे आहे, तशीच ह्या तीनही कलाकारांची भट्टी जमलेली तुम्हांला सिनेमा पाहताना जाणवेल. आपापल्या भूमिका स्वत:मध्ये मुरण्यासाठी सई, ललित आणि पर्णच्या मेहनतीला मोहितच्या दृष्टिकोणाचीही योग्य जोड मिळाली आहे. ह्या सगळ्यांची एकत्रित मेजवानीचं आता 5 जूनला प्रेक्षकांना मिळणार आहे.”

दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणतात, “सई, ललित आणि पर्णमूळे ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची लज्जत काही औरच झाली आहे. तिघांचेही व्यक्तिमत्व, आवडी-निवडी, काम करण्याच्या पध्दती आणि उर्जा वेगवेगळ्या आहेत. पण एक रूचकर सिनेमा बनवायला, हाच वेगळेपणा सिनेमाचा समतोल राखण्यात आणि नाट्य खुलवण्यासाठी खूप परिणामकारकपणे उपयोगी पडलाय.”

सूत्रांच्या माहितीनूसार, सध्या हा सिनेमा पोस्ट प्रॉडक्शनमध्ये असल्याने चित्रपट संपूर्णपणे तयार व्हायला अजून काही काळ लागणार आहे. आणि त्यानंतर उन्हाळ्यांच्या सुट्ट्या संपल्यावर आणि पावसाळा सुरू होण्याअगोदर रिलॅक्स मूडमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा एन्जॉय करता यावा, म्हणून सिनेमाच्या टिमने एकत्रितपणे रिलीज डेट 5 जून ठरवली आहे.

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. ह्या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर ह्यांच्याशिवाय सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, ह्या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button