Marathi News

‘नशीबवान’ भाऊंच्या ‘उनाड पाखराची झेप’

Nashibvaan
Nashibvaan
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित ‘नशीबवान’ चित्रपटाचं नवीन गाणं ‘पाखरू’ रिलीज झाले आहे. एक सामान्य माणूस आपल्या बायको, मुलांना घेऊन जेव्हा प्रथमच बाहेर फिरायला निघतो तेव्हा तो  मॉल मध्ये जातो. आजच्या काळात महत्त्वाची ठरत असलेल्या मॉल संस्कृतीत तो जेव्हा फिरतो तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ‘मॉलचे’ खूप अप्रूप वाटते. संपूर्ण मॉल नजरेने निहारताना त्याच्या नजरेत असलेली  उत्सुकता आणि आनंद आपल्याला गाणं पाहताना जाणवते. सामान्य माणूस पैशाअभावी जो आनंद स्वतः घेऊ शकत नाही आणि परिवाराला देऊ शकत नाही. तो आनंद  पैसे मिळाल्यामुळे कुटुंबाला देण्याचा प्रयत्न भाऊ कदम या गाण्यात करताना दिसत आहे. छान तयार होऊन आजूबाजूच्या लोकांना आनंदाने जोरात सांगत भाऊ आणि त्याचे कुटुंब बाहेर फिरायला जाते.
मॉल फिरून झाल्यानंतर  मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करताना भाऊ कदम आणि परिवार दिसत आहे. या गाण्यात दिग्दर्शकाने अगदी छोट्या छोट्या गोष्टी टिपल्या आहेत. जसे मॉल मध्ये टॉयट्रेनमध्ये बसल्यावर मुलांना सांभाळून नीट बसवताना वाटणारी भीती, हॉटेलमध्ये वेटरकडून जेवण वाढून घेताना होणारी अस्वस्थता, जेवण झाल्यावर टिशु पेपरमध्ये खडीसाखर बांधून घेणे हे सर्व बघताना आपण या गाण्याला कुठेना कुठे जोडून घेतो. या गाण्यात भाऊ कदम, मिताली जगताप – वराडकर यांचे प्रचंड बोलके दिसणारे  डोळे. त्यात शाल्मली खोलगडेचा भारदस्त आवाज, सोहम पाठक यांचे अप्रतिम संगीत आणि जोडीला शिवकुमार ढाले यांचे अर्थपूर्ण शब्द. एवढे सगळे उत्तम जुळून आल्यानंतर हे गाणे पाहिल्यावर फक्त एकच प्रतिक्रिया तोंडातून निघते आणि ती म्हणजे निव्वळ अप्रतिम.
लँडमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेला ‘नशीबवान’ हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांनी निर्मात्यांची  धुरा सांभाळली असून प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप – वराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे आदींचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button