Marathi News

चंकी पांडे म्हणतोय ‘विकून टाक’

Vikun Taak Marathi Movie
Vikun Taak Marathi Movie

सध्या मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ सुरु आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपट मराठी भाषेत तयार होत असल्याने दुसऱ्या भाषेतील कलाकार मराठीकडे आकर्षित होताना दिसत आहे. दिवसेंदिवस अशा कलाकारांच्या यादीत वाढ होत आहे. याच यादीत आता नवीन नाव जोडले जाणार आहे, ते म्हणजे चंकी पांडे यांचे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता चंकी पांडे लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या चित्रपटात चंकी पांडे महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये गर्भश्रीमंत अशा अरब लोकांचे प्रतीक असणारा उंट घेऊन चंकी पांडे अरब लोकांच्या वेशभूषेत हातात पैशाचे बंडल घेऊन शिवराज वायचळ आणि रोहित माने यांना हाताने मान दाबताना दिसत आहे. पोस्टर पाहून शिवराज आणि रोहित नक्कीच कोणत्यातरी संकटात अडकले आहेत आणि हे संकट चंकी पांडेशी संबंधित आहे हे नक्की. आता हे संकट कोणते? शिवराज, रोहित त्यात कसे अडकतात? ह्या सर्व प्रश्नांची उत्तर सिनेमा पाहिल्यावर मिळतीलच. हे पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.
चंकी पांडे त्यांच्या या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल सांगतात, ” ‘विकून टाक’ हा माझा पहिलाच मराठी चित्रपट असून याआधी मी बंगाली आणि तेलुगू या प्रादेशिक चित्रपटांत काम केले आहे. अभिनय क्षेत्रात आल्यापासूनच मला मराठी सिनेमात काम करण्याची खूप इच्छा होती आणि मागील काही वर्षांतील मराठी चित्रपट पाहता, माझी ही इच्छा अधिकच बळावली. त्यासाठी मी चांगल्या संहितेच्या शोधात होतो. ‘विकून टाक’ या चित्रपटाबद्दल जेव्हा मला विचारण्यात आले, तेव्हा नकार देण्याकरता माझ्याकडे काही कारणच नव्हते. ‘बालक -पालक’, ‘यल्लो’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा सर्जनशील निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूर तर  ‘पोस्टर बॉईज’ सारख्या विनोदी आणि हटके चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा समीर पाटील. या जमेच्या बाजू होत्याच शिवाय या चित्रपटातून मिळणारा सामाजिक संदेश. या चित्रपटाचा विषय मला खूप आवडला. हा सिनेमा ग्रामीण भागातील महत्त्वाच्या समस्येवर भाष्य करणारा असून चित्रपट पाहिल्यावर या विषयावर विचार करणे किती महत्वाचे आहे, हे प्रेक्षकांनाही कळेल. भाषेच्या बाबतीत सांगायचे तर मला फारशी अडचण आली नाही. मुळात माझा जन्म मुंबईतील असल्यामुळे मी बऱ्यापैकी मराठी बोलू शकतो आणि मराठी भाषा मला आवडते. मराठी भाषेतील विनोदबुद्धीची आपण इतर अन्य भाषेशी तुलनाच करू शकत नाही. ‘विकून टाक’च्या निमित्ताने माझे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले असून मी खूपच उत्साहित आहे.”
‘बालक पालक’, ‘येल्लो’, ‘डोक्याला शॉट’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ हा सिनेमा येत्या ३१ जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘विकून टाक’ सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. समीर पाटील यांनी यापूर्वी ‘पोस्टर बॉईज’, ‘पोस्टर गर्ल’ असे हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृ
षिकेश जोशी, वर्षा दांदळे यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. रोहित माने याचा ‘विकून टाक’ हा पहिलाच सिनेमा असणार आहे. तर मग तयार राहा २०२० ची  दणक्यात सुरुवात करण्यासाठी.

https://youtu.be/iqmKnCvKTLU

Related Articles

Leave a Reply

Back to top button