Marathi News

VRUNDAVAN – आला रे आला वृंदावनचा डॅशिंग गोविंदा

मुंबई, १७ जानेवारी, २०१६
चहुबाजूला तुफान गर्दी, गुलालात माखलेले कपडे, आणि हंडी फोडण्यासाठी जमलेले गोविंदा पथक हे सारे दृश्य होते ते ‘वृंदावन’ या सिनेमाच्या ‘आला रे आला डॅशिंग गोविंदा’ या गाण्याच्या चित्रीकरणाचे. टीलव्ही प्रसाद दिग्दर्शित वृंदावन या सिनेमाचे दहीहंडीवर आधारित गाण्याच नुकतच गोरेगाव फिल्मसिटीत चित्रीकरण करण्यात आलं. तब्बल ६००हून अधिक कलाकारांना घेऊन या गाण्याचे रोल अॅक्शन कॅमेरा या नोटवर ग्रँड चित्रीकरण करण्यात आलं. मराठी सिनेसृष्टीत दमदार  पदार्पण करणारा  राकेश बापट, पूजा सावंत,  वैदेही परशुरामी या तिघांवर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. बॉलीवूडचे नावाजलेले कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी या धमाकेदार गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. गणेश आचार्य यांनी आतापर्यंत हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना आपल्या तालावर नाचवले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी अमितराज आणि अवधूत गुप्ते यांनीदेखील उपस्थिती लावली होती.
   गोरेगाव फिल्मसिटीत चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यासाठी दहीहंडीचा सेट उभारण्यात आला होता. अगदी नादखुळा करून सोडणा-या ‘आला रे आला डेशिंग गोविंदा’ गाण्याचे शब्द सचिन पाठक (यो) यांनी लिहिले असून, अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. शिवाय आपल्या आवाजाने प्रत्येक गाण्यात धम्माल उडवून देणारे अवधूत गुप्ते यांनी गायले असून येत्या गोविंदाला हे गाण तुफान गाजणार यात शंका नाही. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश मांजरेकर, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदीदेखील या सिनेमात पाहता येणार आहे. एक नायक, दोन नायिका आणि खलनायक असा एंटरटेनमेंटचा भन्नाट फॉर्म्युला असेलला हा सिनेमा आहे.
राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर , जिगर कादाकिया या चौघांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे.’रिअलस्टिक फिल्म कंपनी’ या बॅनर खाली निर्मिती केली असून अमित आणि अनघा कारखानीस हे सहनिर्माते आहेत, तर जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान हे सिनेमाचे प्रमोटर्स आहेत.मल्टीस्टार आणि एंटरटेनमेंटचा कम्प्लीट पॅकेज असलेला ‘वृंदावन’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button