‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर !

मराठी सिनेसृष्टीला ‘पोश्टर बॉईज’, ‘पोश्टर गर्ल’ सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक समीर पाटील घेऊन येत आहेत एक भन्नाट चित्रपट ‘विकून टाक’. एव्हाना चित्रपटाचा पोस्टर, टिझर बघून थोडीफार कल्पना आलीच असेल, की यातही काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार. या चित्रपटातील ‘दादाचं लगीन’, ‘डोळ्यामंदी तुझा चांदवा’ या गाण्यांनाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांची हीच उत्सुकता आता अधिक वाढवण्यासाठी घेऊन आलो आहोत ‘विकून टाक’चा जबरदस्त ट्रेलर. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा कलाकारांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थित मुंबईत पार पडला. बऱ्याच काळाने मराठी सिनेसृष्टीत मोठा विनोदी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने शिवाय चंकी पांडेसारखा नावाजलेला बॉलिवूड कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीमध्ये पदार्पण करत असल्याने उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झाला होता.

”अभिनय क्षेत्रात आल्यापासूनच मला मराठीत काम करण्याची इच्छा होती आणि ही इच्छा ‘विकून टाक’ सारख्या चित्रपटाद्वारे पूर्ण झाली. या चित्रपटाला होकार देण्याची काही कारणे आहेत, दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती करणारा तरुण निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूर, सामान्य विषय हाताळून असामान्य चित्रपट बनवणारे दिग्दर्शक समीर पाटील आणि ‘विकून टाक’ची कथा. इतक्या जमेच्या बाजू असताना नाही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राहिला प्रश्न माझ्या भाषेचा. तर त्यातही काही अडचण आली नाही कारण इतकी वर्षं मी मुंबईत राहत असल्याने मराठीशी माझी नाळ जुळली आहे. मराठी भाषेच्या विनोदबुद्धीची अन्य भाषांशी तुलनाच होऊ शकत नाही. ‘विकून टाक’ हा हसतहसत प्रेक्षकांना नकळत विचार करायला लावणारा चित्रपट आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” आपला हा चित्रपटाबद्दलचा अनुभव मराठीत व्यक्त करत चंकी पांडे यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला निर्माते उत्तुंग हितेंद्र ठाकूर, दिग्दर्शक समीर पाटील, चित्रपटाची संपूर्ण टीम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ट्रेलरवरून ही कथा देखील ग्रामीण भागात घडणारी असून या गावातील हॅण्डसम मुलगा ‘मुकुंद तोरांबे’ याच्या अवतीभवती फिरणारी आहे. सर्वसामान्य आयुष्य जगत असतानाच त्याच्या आयुष्यात काही घटना घडताना दिसत आहेत, त्यातच अधिक भर म्हणून त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित पाहुणाही आलेला दिसतोय. हा दुबईहून आलेला पाहुणा मुकुंदला का शोधतोय? मुकुंद आणि त्या अरब शेखचे काय कनेक्शन? आणि या सगळयात गावकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेल्या शंका, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चित्रपट आल्यावरच कळतील. तत्पूर्वी ट्रेलरवरून चित्रपट धमाल असणार, हे नक्की.

मुळात एखादा सामाजिक विषय हलक्याफुलक्या, विनोदी पद्धतीने मांडला तर तो प्रेक्षकांना अधिक भावतो, असे मानणाऱ्या समीर पाटील यांनी ‘विकून टाक’द्वारेही काहीतरी प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हा संदेश कोणता, हे जाणून घेण्यासाठी मात्र ३१ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल. विवा इनएन प्रॉडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून या चित्रपटात  शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळाने समीर पाटील यांचा अभिनय प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. सिद्धेश्वर एकांबे यांची कथा आणि चारुदत्त भागवत, समीर पाटील यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाला अमितराज यांनी संगीतबद्ध केले असून गुरु ठाकूर गीतकार आहेत. तर चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन वृषाली चव्हाण यांनी केले असून छायाचित्रणाची जबाबदारी सुहास गुजराथी आणि कला दिग्दर्शनाची जबाबदारी संतोष फुटाणे यांनी पार पाडली आहे.

 

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply