क्रांतिकारी सहजीवनाची सुरुवात
नव्या वर्षात सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेली, सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांच्या सहजीवनावर आधारित सावित्रीजोती ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे.
आत्तपर्यंतच्या भागांमध्ये छोट्या जोतीची शिक्षणाची ओढ आणि रुढी-परंपरांबद्दल त्याला पडणारे प्रश्न हे प्रेक्षकांनी पाहिलं आहे. छोटी सावीसुद्धा हुशार, चुणचुणीत आणि मनानं हळवी आहे. तिची आजूबाजूच्या व्यक्तींना सांभाळून घेण्याची सवय आणि सर्वांबद्दलची कळकळ तिच्या वागण्यातून दिसते.आता घरातल्यांच्या पसंतीनं सावित्री आणि जोतीरावांचा विवाह ठरला आहे.
मालिकेतल्या येत्या काही भागांत सावित्रीबाई आणि जोतीराव यांचा विवाह संपन्न होणार आहे. ज्यांनी इतिहास घडवला अशा दोन व्यक्तींच्या सहजीवनाची सुरुवात म्हणजेच हे लग्न, पण ते वाटत तितकं सोपं नाही. या लग्नात विचारांचा संघर्ष आहे, मान-अपमानाचा खेळ आहे. आत्तापर्यंत काही ना काही कुरबुरी करणारे केशवभट्ट लग्नात अडथळा आणू पाहतात. जोतीरावांचे नातेवाईकसुद्धा स्वतःच्या स्वार्थसाठी लग्न मोडण्याचा प्रयत्न करतात आणि तो प्रयत्न फसल्यावर ते हुंडा मागण्याचाही प्रयत्न करतात पण त्या वेळी जोतीरावांचे वडील मध्ये पडून सावित्रीच्या घरातल्यांची बाजू घेऊन हुंडा घेण्यास नकार देतात. जोतीरावांवर झालेल्या संस्कारांची पाळेमुळे यातून दिसून येतात.
लगीनसराई सुरू झाल्यावर होणाऱ्या काही प्रथांविषयी छोटा जोती प्रश्न विचारताना दिसतो. त्याच्या वावरण्यातून त्याच्या वागण्यातून त्याचे समाजप्रबोधनाचे विचार दिसून येतात. जोतींरावांनी आपल्या अस्पृश्य मित्रांवर नेऊन उधळलेला भंडारा असुंदे, नर्मदेच्या बालविवाह विरोधात उठवलेला आवाज असुदे. हे सर्व त्या काळाच्या पुढचं होतं.
सावित्रीबाई आणि जोतीराव खरंच आभाळाएवढी माणसं होती. त्यांच्या वागण्यातून आणि विचारातून हे पदोपदी स्पष्ट झालेलं आहे.
सावित्रीबाई आणि जोतीरावांचे लग्न हा संपूर्ण समाजासाठी एका मोठ्या बदलाचा क्षण होता. या असामान्य जोडप्यानं भविष्यात विचारांची क्रांती घडवून समाजाला नवी दिशा दिली. सावित्रीबाई-जोतीराव हे एक आदर्श दाम्पत्य होते. शांततामय सहजीनाचे व्याकरणच जणू या दोघांनी लिहिले. सावित्रीबाई जेव्हा माप ओलांडून फुले वाड्यात आल्या तेव्हा त्यांनी नवोनत्तीचे माप ओलांडले होते. फुले दाम्पत्याने फक्त समाजप्रबोधनाची वात पेटवली नाही तर विचारांचा नंदादीप सतत तेवत ठेवला.
तर साक्षीदार व्हा अशा या असामान्य जोडप्याच्या अभूतपूर्व विवाह सोहळ्याचे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता फक्त सोनी मराठी वर.