Marathi News
राजेश,भूषण यांचा आक्रमक ‘शिमगा’
कोकणातील ‘शिमगा’ हा सण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. कोकणातील याच ‘शिमगा’ सणाशी संबंधित ‘शिमगा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर आणि चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित झाले आहे. ते पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. कोकणात ‘शिमगा’ साजरा करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत. असा हा नेत्रदीपक सोहळा चित्रपटाच्या रूपाने आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान आक्रमक भावमुद्रेत दिसत असून त्यांच्या मागे आगीच्या ज्वाळा आणि त्यात पेटत असणारे घर दिसत आहे. आता या ज्वाळा शिमगा संबंधित आहेत की अजून दुसरे काही कारण आहे हे चिञपट पाहिल्यावरच समजेल पण या चित्रपटात ‘शिमगा’ या सणासोबत अजून वेगळे काहीतरी आणि मनोरंजनात्मक असणार हे नक्की.
‘शिमगा’ हा चित्रपट श्री केळमाई भवानी प्रॉडक्शनची निर्मित आहे. मूळचे कोकणाचे असणारे निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, भूषण प्रधान आणि कमलेश सावंत यांच्यासह विजय आंदळकर, सुकन्या सुर्वे आणि नवोदित अभिनेत्री मानसी पंड्या यांच्या भूमिका आहेत. तर पंकज पडघन यांची सुमधुर गीते आहेत. गुरु ठाकूर आणि वलय यांची गीते यात असणार आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रीकरणाची धुरा अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे. होळीच्या म्हणजेच शिमग्याचा मुहूर्त गाठत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे