Marathi News

अभिनेत्री ‘स्मिता तांबे करतेय ‘सावट’ चित्रपटाव्दारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Saavat Smita Tambe

 

गेलं जवळ जवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमूळे स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करतेय. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या ‘सावट’ ह्या सिनेमाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.’ सोबतच स्मिता तांबेचे ‘रिंगींग रेन’ प्रॉडक्शन हाऊस करते आहे.

सावट सिनेमात इन्स्पेक्टर आदिती देशमुखच्या भूमिकेत असलेली स्मिता तांबे म्हणते, “उंबरठा आणि ‘जैत रे जैत’च्या स्मिता पाटील ह्यांच्या भूमिका, ‘एक होता विदुषक’ सिनेमातली मधु कांबीकरांची भूमिका, स्मिता तळवलकरांची ‘चौकट राजा’मधली भूमिका, ‘उत्तरायण’मधली नीना कुलकर्णींची भूमिका ह्या आणि अशा सशक्त स्त्री व्यक्तिरेखांनी कायम माझ्या मनावर गारूड केलंय. म्हणूनच असावं कदाचित मला अभिनय क्षेत्रात नेहमीच सशक्त महिलांच्याच भूमिका आकर्षित करत राहिल्यात. सीबीआय ऑफिसर आदिती देशमुखची भूमिकाही अशीच सशक्त, हुशार पोलिस अधिका-याची आहे.”

‘सावट’मध्ये अभिनय करण्यासोबतच सिनेमाची निर्मिती करण्याविषयी विचारल्यावर स्मिता तांबे म्हणाली, “सौरभ फिल्म घेऊन आला तेव्हा मला चित्रपटाची कथा एवढी आवडली की, मी सिनेमात काम करण्यासोबतच ह्या सिनेमाची निर्मिती करायचे ठरवले.”

जागतिक महिला दिन 8 मार्चला असतो. आणि त्याच महिन्यात सशक्त स्त्रीभूमिका साकारणा-या स्मिता तांबे महिला सबलीकरणावरच्या सिनेमाव्दारे निर्माती म्हणून पदार्पण करतेय. ह्या योगायोगाविषयी स्मिता तांबेने सांगितलं की, “खरं तर, सिनेमाची रिलीज डेट ठरवताना, असं मुद्दामहून काहीच ठरवलं नव्हतं. पण त्यानंतर आता हा योगायोग लक्षात येतोय. ही खूप छान गोष्ट आहे की, एक सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमातून महिला सबलीकरणाचा एक वेगळा विचार घेऊन येताना आम्ही तो मार्चमध्येच आणतोय.”

‘रिंगीग रेन’ आणि ‘निरक्ष फिल्म’च्या सहयोगाने ‘लेटरल वर्क्स प्रा.लि.’प्रस्तुत, स्मिता तांबे, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ चित्रपटातश्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे  मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला  संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button