Marathi News

RAIGAD FESTIVAL -रायगड महोत्सवामुळे रायगड जागतिक

पर्यटनांच्या नकाशावर पोहोचेल – विनोद तावडे

२१ ते २४ जानेवारी भव्य रायगड महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. १९ :शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रायगड किल्लावर प्रत्यक्ष उभारण्य़ासाठी रायगडावर शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्यापाशी पाचाड येथे रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे शिवकालीन संस्कृतीचा इतिहास उलगडणार असून या महोत्सवामुळे रायगड जागतिक पर्यटनांच्या जागतिक नकाशावर पोहोचेल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.

दिनांक २१ ते २४ जानेवारी 2016 या कालावधीत रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी पाचड येथे आयोजित करण्यात आलेल्या रायगड महोत्सवाची माहिती देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. त्या पत्रकार परिषदे दरम्यान रायगड महोत्सवाची माहिती उपस्थित पत्रकारांना देण्यात आली. त्यावेळी श्री. तावडे बोलत होते.

श्री. तावडे यावेळी म्हणाले की, एखादया किल्ल्यावर महोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या महोत्सवात सुमारे १ हजार कलाकार सहभागी होणार असून येथील स्थानिक रहिवाशांना महोत्सवामुळे रोजगार मिळाला आहे. या महोत्सवासाठी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यक त्या सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.शिवकालीन संस्कृतीचा चैतन्यदायी इतिहास मांडणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैलू नव्या पिढीसमोर मांडणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यांचा रोमहर्षक इतिहास नव्या पिढीसमोर सादर करणे, पर्यटकांमध्ये गड, किल्ले याविषयी आवड निर्माण करणे असा उददेश आहे.

दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार असून त्यानंतर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊ वाडयालगत विस्तीर्ण माळ रानावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे उदघाटनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय अवजड उदयोग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश मेहता, आमदार भरत गोगावले, विधानपरिषद सदस्य जयंत पाटील, विधानपरिषद सदस्य सुनील तटकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचेही श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.

दिनांक २२  ते २४ जानेवारी या कालावधीसाठी हा महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे. रायगड किल्ल्यावर सकाळी ९ पासून संध्याकाळी ५ पर्यंत महादरवाजा, सभामंडप, राणीवसा,अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधी स्थळ यांची इतिहासकालीन सजावट करण्यात येणार आहे. शाहिर, वासुदेव, भारुडकर आणि गोंधळी शिवस्तुती सादर करणार आहेत. गडाच्या पायथ्याशी पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात आली असून सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत शिवकालीन इतिहास कथन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिववैभवाचे दर्शन घडविणाऱ्या शिवसृष्टीत शिवराज्याभिषेक सोहळा, शिवकालीन नाणी प्रदर्शन, किल्ल्यांच्या प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे, इतिहासतज्ञांच्या व्याख्यानमाला, लोककलांचे दर्शन, ढोलताशांची आतषबाजी, शिवकालीन कथांचे कथाकथन उलगडून दाखविणारे दृक श्राव्य कार्यक्रम, पालखी,किर्तन, भारुड,गोंधळ असे सोहळे आयोजित करण्यात आले आहे. रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी येणाऱ्या पर्यटकांना दोन्ही ठिकाणी प्रवेश मोफत असल्याचेही श्री. तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रायगड महोत्सवामध्ये राज्याभिषेक सोहळा सुध्दा आयोजित करण्यात येणार आहे, तसेच शभुंराजे यांचे नाट्य नितिन बाणगुडे पाटील सादर करतील, नंदेश उमप शिवसोहळा तर सुभाष नकाशे शिवगर्जना नाट्य़ सादर करणार आहेत असेही श्री. तावडे यांनी सांगितले.,

रायगड महोत्सवाच्या निमित्ताने रायगड किल्ल्याची पाय-या दुरुस्ती, तेथील रेलिंग, तसेच पाचाड येथे पाणी योजना, पुरेशी वीजेची व्यवस्था, रस्ता रुंदीकरण आदी कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत असे सांगतानाच श्री. तावडे म्हणाले की, रायगड महोत्सवाच्या निमित्ताने या सोयी सुविधा सुरु करण्यात आल्या असून भविष्यात अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. रायगड ला केंद्राच्या पुरातत्व विभागाकडे आहे, त्यामुळे नजिकच्या काळात रायगडाला जतन करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून एमओयु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button