Kshitij Children’s Day Special – गरजू मुलांसोबत ‘क्षितीज’ टीमने साजरा केला बालदिन
मुले ही देवा घरची फुले असतात, असे म्हणतात. ही फुलं कोमेजून न जाता त्यांचा सुगंध सगळीकडे पसरवण्याची काळजी प्रत्येकांनी घ्यायला हवी. त्यासाठी ‘शिक्षण’ हे सर्वात महत्वाचे काम करते. समाजातील प्रत्येक लहान मुल जेव्हा शिक्षित होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक विकास होईल, हा संदेश ‘क्षितीज’ हा आगामी सिनेमा देतो. आज अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना सामाजिक हातभार म्हणून या सिनेमाच्या टीमने ठाण्यातील काही गरजू मुलांसोबत बालदिन साजरा केला. संपूर्ण भारतात १४ नोव्हेंबर रोजी साजरा होत असलेल्या बालदिनाच्या निमित्ताने १२ नोव्हेंबर रोजी ठाण्यतील सिंग्नल स्कूलच्या गरीब आणी गरजू मुलांना पुस्तक आणि पेन वाटप करून शिक्षणाचा सामाजिक संदेश दिला.
सिग्नलवरील गरीब मुलांचे घरकुल असणा-या या शाळेत समर्थ भारत व्यासपीठ अंतर्गत राबविले गेलेल्या या कार्यक्रमाला ठाणे महानगर पालिकेचा देखील हातभार आहे. ठाणे महानगर पालिकेशी सलग्न असलेल्या या सामाजिक संस्थेने आतापर्यत अनेक गरजू मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले आहे. त्यामुळे नवरोज प्रसला निर्मित आणि करिष्मा म्हडोलकर सहनिर्मित तसेच मनोज कदम दिग्दर्शित ‘क्षितीज’ या चित्रपटाच्या टीमने संपूर्ण स्टारकास्ट सोबत या शाळेत बालदिन साजरा करण्याचा विचार केला. या सिनेमाची प्रमुख बालकलाकार वैष्णवी तांगडे हिच्या हस्ते मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शिवाय लहान मुलांना आवडणारे चॉकलेट आणि केक कापून सिनेमाच्या टीमने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिनाचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच वैष्णवीने सिनेमातील गाण्यावर उपस्थित मुलांसोबत डान्स देखील केला. शिक्षणाचा अधिकार प्रत्येकांला असून, व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेची पायरी चढणे अत्यावश्यक आहे. हाच संदेश या सिनेमाच्या टीमने या कार्यक्रमात दिला. बालदिनाच्या या कार्यक्रमात सिनेमाची सहनिर्माती करिष्मा म्हडोलकर, दिग्दर्शक मनोज कदम, अभिनेता उपेंद्र लिमये, अभिनेत्री कांचन जाधव, संभाजी तांगडे तसेच कोरियोग्राफर सागर म्हाडोलकर हे देखील उपस्थित होते.