काळ’च्या निमित्ताने पहिल्यांदाच रशियात वाजणार मराठी चित्रपटाचा डंका
काही दिवसांपूर्वी ‘काळ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या सिनेमाच्या निर्मात्यांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. आधी हा सिनेमा २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता पण आता हा सिनेमा ३१ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे. त्याचबरोबर सिनेमाचा दूसरा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे .
‘काळ’ हा सिनेमा महाराष्ट्राबरोबर रशियात देखील प्रदर्शित केला जाणार आहे, रशियामध्ये ३० शहरांमध्ये १०० स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार असून रशियात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.
‘काळ’चे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन डी संदीप यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनचे हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर तसेच नितिन प्रकाश वैद्य आणि डी संदीप यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.