Marathi News

मराठमोळ्या अमित शिंगटेचं विशाल स्वप्न

Amit Shingate
आज मुंबईत कुठेही चित्रिकरण करायचं असेल तर सगळ्यात आधी पर्याय असतो तो फिल्मसिटीचा. ‌मोठी जागा असल्यामुळे अनेक सिनेमा, मालिका यांची चित्रिकरणे तिथे होत असतात. आज परिस्थिती अशी आहे की फिल्मसिटीमध्ये असलेले स्टुडिओज कमालीचे व्यस्त आहेत. मालिका असो किंवा सिनेमा एकदा एखादी जागा ठरवली की तिथे पुढे काही वर्षं शुटिंग चालतं. याला पर्याय म्हणून मढ विकसित झालं. तिथेही अनेक बंगल्यांमध्ये मराठी, हिंदी सिनेमांची, म‌ालिकांची शुटिंग्ज चालतात. यापलिकडे इनडोअर शुटिंगची बात असेल तर मेहबुब, आरके यांसारखे पर्याय आहेत. पण तिथे जागेची मर्यादा आहे. अन्यथा दहीसर टोल नाका ओलांडून पुढे जायची तयारी ठेवायला लागते. पण, फिल्मसिटी, मढ आदींना आता एक भक्कम पर्याय उभा राहिला आहे तो बोरिवलीत. यासाठी टोलनाका ओलांडण्याचीही गरज नाही. या पर्यायाचं नाव आहे एल.पी.शिंगटे स्टुडिओ. 
बोरिवलीच्या नॅशनल पार्कला खेटून एक १२ एकर जागा आहे हे कुणाला सांगूनही पटणार नाही. एरवी ही जागा पडूनच असती. पण अभिनेता, उद्योगपती अमित शिंगटे आणि त्यांचा भाऊ युवराज शिंगटे यांनी आपल्या व्हिजनने काही नव्या योजना आखायच्या ठरवल्या. यातूनच उदयाला आला एल.पी.शिंगटे स्टुडिओ. सहज पर्याय म्हणून अमित यांनी ही जागा सिनेमासाठी भाड्याने देण्याचा एक विचार सुरु केला. एकसलग एक सपाट १२ एकर जागा लक्षात घेऊन मराठी नव्हे, तर थेट हिंदी सिनेसृष्टीच्या उड्या या जागेवर पडल्या. म्हणूनच आज इथे गब्बर, रावडी राठोड अशा सिनेमांचे शुटिंग झाले. मुंबईतल्या मुंबईत इतकी मोठी जागा असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शिंगटे स्टुडिओमध्ये दाखल झाले यशराज बॅनर. हा स्टुडिओ तीन महिन्यांसाठी बुक करुन एक बड्या सिनेमाचा सेट इथे लावण्यात आला आहे. रोहीत शेट्टी, करण जोहर, संजय लीला भन्साळी आदी बड्या लोकांनीही या जागेची पाहणी करुन ठेवली आहे.
सुरक्षेची चोख व्यवस्था, आगर्पतिरोधक यंत्रणा, उत्तम बडदास्त यांमुळे शिंगटे स्टुडिओ आता नावारुपाला येऊ लागला आहे. हिंदीसह या जागेचा वापर मराठी सिनेसृष्टीसाठीही करुन देण्याचा अमित यांचा मानस आहे. म्हणूनच मराठी सिनेसृष्टीसाठी तब्बल ५० टक्क्यांची सवलत त्यांनी जाहीर केली. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पाठोपाठ अमित शिंगटे या मराठी माणसाने एक मोठं स्वप्न पाहिलं आहे. अमित स्वतः याबाबत उत्सुक आहेत. ‘फिल्मसिटीचा पर्याय सोडला तर मुंबई विभागात आज एवढी जागा मिळत नाही. आमच्याकडे ती जागा आहे. शिवाय, शुटिंगसाठी लागणारी सुरक्षा, एकांत, शांतता इथे आहे. २४ तास स्टुडिओची माणसे इथे तैनात असतात. हिंदीमधून विचारणा होते आहेच. परंतु, एक मराठी असल्याकारणाने मराठी सिनेसृष्टीसाठीही आम्ही बांधील आहोत. अक्षयकुमार, सचिन पिळगांवकर, रोहीत शेट्टी आदींनी या जागेचे कौतुक केले आहेच. ही केवळ जागा न ठेवता येत्या काळात इथे फ्लोअर बांधण्याचेही नियोजन आहे. जेणेकरुन येथील परिसरात उत्तम रोजगार निर्माण होईल. कलाकारांची सोय होईल आणि मराठीसह हिंदी सिनेसृष्टीमध्ये शिंगटे स्टुडिओचं योगदान असेल.’

Related Articles

Leave a Reply

Back to top button