‘आणि काय हवं?’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट
मराठी सिनेसृष्टीतील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखणारे प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे . या आधी ‘टाईम प्लीज’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता ‘आणि काय हवं?’ या मराठी वेब सिरीजच्या माध्यमातून ही जोडी सात वर्षांनी आपल्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजमध्ये लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्यांमध्ये घडणारे अमुल्य आणि तितकेच महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले आहेत.
मग यामध्ये स्वत: विकत घेतलेले पहिले घर, एकत्र साजरे केलेले सण या सर्वच गोष्टी नेहमी लक्षात राहणाऱ्या असतात. वेबसिरीजच्या अनुभवाबद्दल प्रिया म्हणते, की “या वेबसिरीजची टीम मला माझ्या कुटुंबासारखी वाटते. तसेच या वेबसिरीजमध्ये लग्न झालेलं जोडपं आहे. जे त्यांच्या लग्नानंतरचे काही सुंदर क्षण पहिल्यांदा अनुभवताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे उमेशसोबत खूप वर्षांनी काम करण्याचा अनुभव चांगलाच होता आणि त्यात लग्नानंतरच्या आमच्यासुद्धा काही आठवणी आहेत, त्या आठवणी या वेबसिरीजमुळे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्या”. ‘मुरांबा’ फेम वरूण नार्वेकर दिग्दर्शित, अनिश जोग निर्मित ‘आणि काय हवं? ‘ ही सहा भागांची वेबसिरीज एम.एक्स. एक्सक्लुझिव्हवर प्रदर्शित झाली आहे.