Marathi News

‘दंडम’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच . . .

Dandam Marathi Movie
Dandam Marathi Movie

मराठीमध्ये साऊथच्या तोडीसतोड ॲक्शन आणि दमदार कथानक  घेऊन आलेल्या ‘दंडम’ या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला.  ‘दंडम’च्या ट्रेलरला यगोदरच उत्तम प्रतिसाद मिळाला असून त्याप्रमाणेच म्युझिक लॉन्चला देखील रसिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी मयूर राऊत, रिपुंजय लष्करे, संतोष वारे, अक्षय जांभळे, अजय चोपडे, सोनाजी पाटील तसेच मयूर देशमुख आदी कलाकार उपस्थित होते. तसेच सिनेमाचे दिग्दर्शक व्ही. सत्तू यांच्या समवेत गीतकार सागर बाबानगर, संगीत दिग्दर्शक अभिमन्यू कार्लेकर आदींनीही प्रेक्षकांशी गप्पा मारल्या.

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही. सत्तू म्हणाले, “मराठी सिनेमा केवळ आशयघन असून उपयोग नाही. साऊथच्या तोडीचा सिनेमा बनवायचा असेल तर तितकीच दमदार ॲक्शन असणेदेखील अत्यंत महत्वाचे आहे. सर्व नवे कलाकार घेऊन चित्रपट बनविण्याचा प्रवास खडतर तर होताच पण तितकाच आनंददायीही होता. या सिनेमात सिक्स पॅक असलेला फक्त हिरोच नाही तर सहकलाकारांचेही कमावलेले शरीर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कलाकारांनी ॲक्शन आणि अभिनयावर घेतलेली मेहनत पडद्यावर पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव असेल याची मला खात्री आहे.”

दंडम या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा तसेच शरीर सौष्ठव स्पर्धेत मि. युनिव्हर्स हा किताब पटकावलेला संग्राम चौगुले अभिनयातील पदार्पणाविषयी बोलताना म्हणाला, “पडद्यावर ॲक्टिंगच्या जोडीला ॲक्शन होती आणि ॲक्टर होण्याचं माझं स्वप्नही होतं. त्यामुळे मला हा चित्रपट ऑफर झाला तेव्हा कथानक ऐकल्यावर लगेच मी होकार कळवला. आता चित्रपट सिनेमागृहात यायचा दिवस जवळ आला आहे. कोणतीही गोष्ट सुरुवातीला करताना दडपण येते आणि मीही त्यातून सुटलेलो नाही. इथे प्रेक्षकांपेक्षा मोठा कोणताच कलाकार नाही. माझ्या चाहत्यांनी आजवर मला जे प्रेम दिलं त्याप्रमाणे हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकही देतील याची मला खात्री आहे.”

या कार्यक्रमात दंडम चित्रपटातील ‘बिगी बिगी’, ‘साजनी’, ‘झंझावत’, ‘मन मोहिनी’, ‘द बंगळंग सॉंग’ ही प्रसेनजीत कोसंबी, जसराज जोशी, आदर्श शिंदे, जुईली जोगळेकर, आनंदी जोशी यांनी गायलेली गाणी प्रदर्शित करण्यात अली असून रसिकांना लवकरच ती मिळतील. ‘दंडम’ ही जितकी बीड सारख्या ग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या कलेक्टरची गोष्ट आहे, तितकीच कलेक्टरला मदत करणाऱ्या पीडीतांचीही आहे. एक सरकारी अधिकारी  जर आपले अधिकार वापरू लागला तर तो केवढा बदल घडवू शकतो हे सांगणारा हा सिनेमा आहे. खिळवून ठेवणारे कथानक तर यात आहेच पण त्याचबरोबर तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असा हा सिनेमा १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button