व्हेंटिलेटर चे कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुसकर यांच्याशी खास बातचीत…
सध्या व्हेंटिलेटर या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सोशल मिडियावर उत्कृष्ट प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. मॅगिज पिक्चर्सच्या साथीने पर्पल पेबल पिक्चर्स या प्रियंकाच्या सिनेसंस्थेने व्हेंटिलेटर या सिनेमाची निर्मिती केली तर झी स्टुडिओज् ने हा सिनेमा प्रस्तुत केला आहे. या चित्रपटाच्या सगळ्याचं बाजूंचं कौतुक होत असताना चित्रपटाच्या कास्टिंगविषयी आवर्जून बोललं जात आहे. सव्वा वर्षाच्या बाळापासून 87 वर्षांचे आजोबा… सव्वा वर्ष ते 87 या वयोगटातले दिग्गज व्हेंटिलेटरमध्ये दिसण्याचं श्रेय जातं या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुसकर यांना… हे कास्टिंग किती आव्हानात्मक होतं सांगतायत या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुसकर…
1 व्य्क्तीरेखा शोधण्याचे आव्हान वाटले का?
हो अर्थात, 215 वेगवेगळ्या स्वभावाची माणसं शोधायची हे आव्हान नक्कीच होतं. तुम्ही जेव्हा एखादी कथा लिहिता तेव्हा त्यातली पात्र ती कथा जिवंत करत असतात. त्या प्रत्येक पात्राच्या कथेत असण्यामागे एक गंमत असते. तशी माणसं शोधून काढणं हा खूपच खडतर प्रवास होता. आज मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आम्ही सगळेच भारावून गेलो आहोत आणि आमच्या कष्टाचं चीज झाल्याचा आनंदही आहे.
2.ही शोध मोहीम करण्यासाठी नेमके काय तंत्र वापरले?
तंत्रत्रत्रत्रत्रत्र…. नाही म्हणता येणार… या चित्रपटात स्क्रिप्टपासूनच माझा सहभाग होता. चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुसकर आणि माझ्यामध्ये जेव्हा चर्चा व्हायची, ते मला पात्रांविषयी सांगायचे तेव्हा ती पात्र माझ्या डोळ्यासमोरून जातच होती. मी हिंदीमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे सर्वात प्रथम मी नम्रता कदम यांना माझ्याबरोबर काम करण्याची विनंती केली आणि आम्ही दोघेही कामाला लागलो ज्यात तन्वी अभ्यंकर आम्हाला असिस्ट करत होती…. दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी या कास्टिंगदरम्यान मला सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘अभिनेते शोधू नकोस, माणसं शोधं…’ त्याप्रमाणे मी माणसं शोधत गेलो. कारण माणसं चांगली असतील तर ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करतात. त्यानंतर त्यांचे ऑडिशन्स झाले आणि व्हेंटिलेटरची कास्ट तयार झाली.
3.या मोहिमेत किती दिवस गेले?
खूप वेळ गेला… आम्ही डोंगराच्या पायथ्याशी होतो आणि आम्हाला डोंगर पार करायचा होता…डोंगर म्हणजे अर्थात आमच्या चित्रपटातले राजा कामेरकर ज्यांच्या भूमिकेत आहेत ‘आशुतोष गोवारिकर’… त्यांचा होकार मिळाला… ही आमच्या सगळ्यांसाठीच खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर राहिले ते इतर कलाकार…या प्रत्येक कलाकाराला हाताशी धरून हा चित्रपट तयार झाला. ही सगळी भट्टी जमवताना आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी गेला.
4.सर्वात सहज मिळालेली व्यक्तीरेखा कोणती?
कोणतीही नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुसकर…ज्यांनी राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा या दिग्गजांबबरोबर काम केलं आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीत पर्फेक्शन लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर मनमीत ज्या मुलाला जादू करून दाखवतो त्यासाठी ही आम्ही तब्बल 25 मुलांची ऑडिशन घेतली. विहिरीवर उभं राहणाऱ्या मुलांचंही ऑडिशन घेण्यात आलं होतं. त्यातल्या त्यात शेवटी दिसणारं बाळ सहज मिळालं असं मी म्हणेन. कारण असं की, आम्ही आधी दुसरं बाळ शूट करत होतो मात्र ते तितकं अपिल होत नव्हतं आणि म्हणून मी त्याच्या ‘समोर’ असणाऱ्या बाळाला शूट केलं. तर मी म्हणेन शेवटी फ्लॅशबॅकमध्ये दिसणाऱ्या बाळाचं कास्टिंग सगळ्यांमध्ये सोपं होतं.
5.कोणती व्यक्तीरेखा पटकन सापडली नाही? त्याची कारणे?
खूप छोट्या – छोट्या भूमिका होत्या. त्यासाठी कलाकार शोधणं खूप कठीण होतं. मग ती गावात ताडपत्री घालणारी माणसं असू दे किंवा बंधू काकांना संगीत शिकवणारे शिक्षक… कोणतीही व्यक्तीरेखा सहज सापडलेली नाही. मी म्हटल्याप्रमाणे राजेश मापुसकर यांना प्रत्येक गोष्ट पर्फेक्ट लागते. त्यामुळे हा प्रवास खूप कठीण पण छान होता. आम्ही सुरूवातीला ती पात्र निवडली आणि त्यानंतर तब्बल पाच ते सहा वेळा त्यांच्याबरोबर वर्कशॉप्स केले, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आम्हाला आमच्या व्यक्तीरेखा सापडल्या.
6.कुणा कडून नकार मिळाला होता का?
आम्ही ऑडिशन घेऊन या चित्रपटाचं कास्टिंग केलं. आणि मराठी इंडस्ट्रीला कास्टिंग हा विषय नवीन आहे. त्यामुळे ऑडिशनला यायचं म्हणून नकार देणारे बरेच होते.
7.एवढ्या कलाकारांची फौज, यात आपल्या वाट्याला काय येणार? म्हणून नकार दिलेले किती आहेत?
मराठी कलाकार हे गुणी कलाकार आहेत. त्यांनी एवढी सुंदर कामं करून ठेवलेली आहेत की त्याला तोड नाही. यांना व्हेंटिलेटरसाठी जेव्हा बोलवण्यात आलं…अर्थात 215 कलाकारांची फौज, आपल्या वाट्याला कितीसं काम येईल यापेक्षा व्हेंटिलेटरची कथा ऐकल्यानंतर आपल्यासमोर जे येईल ते आपण उत्कृष्ट करावं, असे कलाकार आम्हाला भेटले. अर्थात आपल्या भूमिकेशी निगडीत काही प्रश्न त्यांच्या डोक्यात होते पण जसे आम्ही पुढे जात गेलो हे प्रश्न आपोआपच सुटत गेले आणि परिणाम तुमच्यासमोर आहे व्हेंटिलेटर च्या रूपात….
8.पहिली निवड कुणाची झाली?
हा प्रश्न खरं तर गंमतीदार आहे. सगळ्यात पहिल्यांदा राजा कामेरकर हे राजेश मापुसकर यांनी लिहिलेलं पात्र अर्थात आशुतोष गोवारिकर सापडले. आणि इतर व्यक्तीरेखांचं म्हणालं तर कांचन कामेरकरच्या भूमिकेतला राहुल पेठे ऑडिशन घेताक्षणीच निवडला गेला.
तर अशी ही रोहन मापुसकर यांची फौज नक्की पहा व्हेंटिलेटर या चित्रपटातून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात….