‘वृंदावन’ सिनेमात तीन दिग्गज प्रथमच एकत्र
मराठी सिनेसृष्टीचे अनेक दशक गाजवणारे दिग्गज कलाकार आपल्याला आगामी वृंदावन सिनेमात पाहायला मिळणार आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर आजही तेवढीच लोकप्रियता कायम ठेवण्यास यशस्वी झालेल्या या दिग्गज कलाकारांमध्ये अशोक सराफ, महेश मांजरेकर आणि शरद पोंक्षे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. या तिघांनाही प्रथमच एकत्र पाहण्याचा योग ‘वृंदावन’या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. या चित्रपटात अशोक सराफ- महेश मांजरेकर- शरद पोंक्षे ही त्रयी बाप-लेकांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच आतापर्यंत नात्यातील विविध पात्रांना आपल्या भूमिकेतून योग्य न्याय देणारे अशोक सराफ या सिनेमातून आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर, महेश मांजरेकर आणि शरद पोंक्षे भाऊ असणार आहेत.
या तिघांबरोबरच भारत गणेशपुरे, मोहन जोशी, आरती सोळंकी आणि उदय टिकेकर या दिग्गजांच्या अभिनयाने नटलेला असा हा सिनेमा असणार आहेत.
या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे, हिंदीतील चार्म अभिनेता राकेश बापट ‘वृंदावन’ या सिनेमात धमाकेदार अॅक्शन सिक्वेन्स करताना दिसेल. राकेशसोबतच पूजा सावंत आणि वैदेही परसुरामी मुख्य भूमिकेत असणार आहेत.
एंटरटेंनमेंटच कम्प्लीट पॅकेज असणा-या या सिनेमाचे दिग्दर्शन साउथचे प्रसिद्ध दिग्दर्शक टीलव्ही प्रसाद यांनी केले आहे. राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पुरकर या तिघांनी मिळून ”रिअलस्टिक फिल्म कंपनी’ च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली असून अमित कारखानीस आणि अनघा कारखानीस हे सहनिर्माते आहेत. जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान हे सिनेमाचे प्रमोटर्स आहेत.हिंदीसृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारे गणेश आचार्य यांनी सिनेमातल्या कलाकारांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं असून अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमात रोमान्स आणि अॅक्शनचा तडकादेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच एंटरटेनमेंटचा मालमसाला असलेला हा चित्रपट येत्या ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.