Marathi News
भावनाशुन्य समाजाचे व्यंग मांडणार ‘करार’
आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी समाजाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी माणसांनी कामाला अक्षरशः वाहून घेतले आहे, त्यासाठी त्याने आपल्या भावनिक मूल्यांनादेखील केव्हाच मागे सोडले आहे. प्रेम आणि नातेसबंधांमध्येही माणूस त्याचा हा ‘वर्कहोलिक’ दृष्टीकोन वापरताना दिसून येतो. अशा या भावनाशुन्य समाजाचे व्यंग ‘करार’ या आगामी सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मनोज कोटियन दिग्दर्शित ‘करार’ या सिनेमाचे क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी निर्मिती केली आहे. तसेच परेश दवे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहे. आपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पाहोचवण्यास नेहमी तत्पर असलेला सुबोध भावे यात मध्यवर्ती भूमिकेत दिसून येणार आहे. आयुष्याला व्यवहाराच्या नजरेतून पाहणाऱ्या लोकांवर टीका करणाऱ्या या सिनेमाचा नुकताच संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत ट्रेलर आणि म्युजिक लॉच करण्यात आला. या सिनेमात सुबोधसोबत उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर या अभिनेत्रीदेखील प्रमुख भूमिकेत आढळणार आहेत. तसेच सुहासिनी मुळे आणि आरती मोरे हे कलाकारदेखील पाहायला मिळणार आहेत.
‘करार हा एक कौटुंबिक सिनेमा असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या सिनेमात पाहायला मिळेल. आपल्या आयुष्यातही चांगल्या गोष्टींचा करार करायला हवा, आयुष्याचे गमक सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल’ असे सुबोधने या सिनेमाविषयी बोलताना सांगितले. या सिनेमात नेहमीच विनोदी भूमिकेत दिसणारी क्रांती गंभीर आणि सोशिक भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याबद्दल सांगताना क्रांतीने सांगितले कि, ‘ही भूमिका माझ्या वाट्याला आली याबद्दल मी दिग्दर्शकांचे आभार मानते. या सिनेमात मी ‘राधा’ नावाची भूमिका करतेय, माझी ही भूमिका इतर सर्व भूमिकांहून अगदी वेगळी असल्यामुळे या सिनेमाबाबत मी खूप उत्साही आहे. शिवाय सुबोधसोबत काम करताना बरेच काही शिकायला देखील मिळत असल्यामुळे, करार हा सिनेमा माझ्यासाठी विशेष आहे’ असे क्रांतीने सांगितले. अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिने देखील या सिनेमाविषयी सांगताना तिच्यालेखी ‘करार’ म्हणजे काय? हे स्पष्ट केले. ‘कामाच्या ओघात आपण कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. आपल्या प्रियजणासोबत काही वेळ काढण्याच्या तसेच त्यांच्या सुखाचा आपण करार करायला हवा असे ती म्हणाली.
सिनेमा समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाऱ्या एका करारबद्ध तरुणांची कथा यात मांडली आहे. आयुष्याला केवळ ‘करार’ म्हणून पाहणाऱ्या या तरुणाच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणीवा, आणि त्यातून भविष्यात उद्भवणा-या समस्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसून येतात. तसेच मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीची होत असलेली तडफड आणि त्यासाठी केला जाणारा व्यवहार या सिनेमाचा महत्वाचा सार आहे. ‘करार’ या सिनेमाचा ट्रेलर भावनाशुन्य झालेल्या समाजाचे कान पिळणारा ठरत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर सोबतच सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांना रोमांचित करणारी आहेत. या गाण्यांचे गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी लेखन केले आहे. संगीतदिग्दर्शक विजय गवंडे आणि परेश शाह यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमयी गायकांचा आवाज लाभला आहे.
संजय जगताप लिखित या सिनेमाची पटकथा आणि संवाद हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले आहेत. ‘करार’ हा सिनेमा रसिकांना मंत्रमुघ्ध करणारा ठरेल यात शंका नाही. आजच्या धावत्या जगात बदल चाललेली मातृत्वाबाद्दलची मानसिकता सांगणारा हा सिनेमा लवकरच संपूर्ण चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.