Marathi News

नि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा दोस्तीगिरी

शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा दोस्तीगिरी हा चित्रपट येत्या 24 ऑगस्टला सिनेमागृहात झळकतो आहे. ह्या चित्रपटाची नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

दोस्तीगिरी सिनेमाच्या पत्रकार परिषदेत सिनेमाचे दिग्दर्शक विजय शिंदे, ह्यांच्यासह संकेत पाठक, राहुल राज डोंगरे, पुजा मळेकर, विजय गीते, पुजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे हे कलाकार उपस्थित होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक विजय शिंदे सांगतात, “दोस्तीगिरी पाच जिवलग मित्र-मैत्रिणींची कथा आहे. मनोज वाडकर ह्यांनी आजच्या कॉलेज युवकांच्या भाषेत सिनेमाचे संवाद लिहिल्याने सिनेमा खूपच मनोरंजक झाला आहे. सिनेमाचे निर्माते कैलासवासी संतोष पानकर ह्यांनी हा सिनेमा घेऊन यायचे स्वप्न तीन वर्षांपूर्वी पाहिले होते. पण दूर्देवाने त्यांचा एक महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला.  त्यांचे स्वप्न आता २४ ऑगस्टला पूर्णत्वास येत असल्याचे समाधान आहे.”

संकेत पाठक सिनेमाविषयी सांगतो, “आम्ही सर्वांनीच हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी कसून मेहनत केली आहे. मी ह्या सिनेमात सॅम ही भूमिका करतोय. आणि योगायोगाने माझे वडिलही मला प्रेमाने सॅम हाक मारायचे. त्यामूळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. ह्या चित्रपटाव्दारे मी सिेनेसृष्टीत पदार्पण करतोय. त्यामूळे ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळतोय, हे जाणून घ्यायला मी खूप उत्सूक आहे. ”

अक्षय वाघमारे सांगतो, “मी युवापिढीविषयक असणा-या अनेक सिनेमांतून काम केले. पण दोस्तीगिरी खूप वेगळा सिनेमा आहे. ह्या सिनेमाच्या सेटवर मला जीवाभावाचे मित्रमैत्रिण मिळाले, आमची सेटवर झालेली खरीखूरी बॉन्डिंगच तुम्हांला सिनेमातून पाहायला मिळणार आहे.”

पूजा जयस्वाल म्हणते, “प्रत्येकासाठीच आपल्या कॉलेजमधली मैत्री खूप खास असते. सिनेमा पाहताना तुम्हांला आपल्या कॉलेजचीच आठवण होईल. मैत्रीच्या नात्यातले वेगवेगळे कंगोरे तुम्हांला ह्या सिनेमात पाहायला मिळतील.”

विजय गीते सांगतो, “मैत्रीच्या अल्लड, खोडकर नात्याविषयीचा सिनेमा असला तरीही पाच मित्रांच्या दोस्तीची मॅच्युअर्ड वाटचाल तुम्हांला सिनेमात दिसेल. आणि ही स्वत:चीच कथा पाहत असल्याची तुम्हांला जाणीव होईल.”

पूजा मळेकर म्हणते,”दोस्तीगिरी सिनेमाच्या  चित्रीकरणावेळीच मला जीवाभावाचे दोस्त मिळाले. जेवढी दोस्ती घट्ट, तेवढी मस्ती जास्त… हाच आमच्याही दोस्तीचा नियम आहे. आमची हीच दोस्ती आणि त्यातली मस्ती तुम्हांला मोठ्या पडद्यावरही 24 ऑगस्टला पाहता येईल. “

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. ‘अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स’ प्रस्तूत ‘मोरया मुव्हिज क्रिएशन्स’ निर्मित “दोस्तीगिरी” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर ह्यांनी लिहीले आहेत. रोहन-रोहन ह्यांचे संगीत असलेला दोस्तीगिरी चित्रपट 24 ऑगस्ट 2018 ला रिलीज होणार आहे.

Trailer Link –

https://youtu.be/RxODUNaixj4

Dostigiri title track –

Related Articles

Leave a Reply

Back to top button