अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार
लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचे दिग्दर्शन असलेला आणि आजच्या आघाडीच्या लोकप्रिय कलाकारांनी साकारलेला ‘मन फकीरा’ हा मराठी चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून नावारूपाला आलेला अभिनेता सुव्रत जोशी आणि ‘काहे दिया परदेस’ मालिकेमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ चित्रपटामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. ‘मन फकीरा’ हा चित्रपट ६ मार्च रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
सुव्रत जोशीने यापूर्वी शिकारी, पार्टी आणि डोक्याला शॉट या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे, त्याचबरोबर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका त्याची विशेष गाजली होती. ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून हा गुणवान कलाकार नाट्यरसिकांचे मनोरंजन करीत आहे. अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून काम करणारी अभिनेत्री सायली संजीव हिची झी मराठी वरील ‘काहे दिया परदेस’ ही तिची मालिका विशेष गाजली. ‘काहे दिया परदेस’ मालिकेत काम करण्यासोबतच तिने ‘पोलिस लाइन’, ‘आटपाडी नाईट्स’ तसेच ‘सातारचा सलमान’ या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.
सुव्रत आणि सायली सांगतात, ‘आम्ही ‘मन फकीरा’ सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. आम्हांला भूषण आणि रिया ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली. एकमेकांबरोबर काम करण्याचा अविस्मरणीय असा अनुभव होता. आमची या चित्रपटासाठी निवड केली याबद्दल दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे हिचे आम्ही खूप खूप आभार मानतो. तिने या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन खूप उत्तमरीत्या केले आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना देखील आवडेल असा आम्हांला विश्वास आहे.’
‘मन फकीरा’ या रोमँटिक ड्रामाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टर, टीझर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर सिनेमाच्या ट्रेलरला देखील सोशल मीडियावर १ मिलियन व्हूज मिळाले आहेत. तरुणांच्या हृदयाला चटकन भिडेल असा चित्रपट असे ज्याचे वर्णन केले जाते आहे तो ‘मन फकिरा’ ६ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
‘फ्रेम्स प्रॉडक्शन’ कंपनीचे हेमंत रूपरेल, रणजीत ठाकूर आणि ‘स्मिता फिल्म प्रॉडक्शन्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी यांची आहे.