‘स्माईल प्लीज’चा ‘श्वास’


रात्र सरल्यानंतर सकाळ ही होतेच. याच उक्तीप्रमाणे दुःखानंतर सुखही येणारच असते. असाच काहीसा सकारात्मक संदेश देणारे ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटातील ‘श्वास दे’ हे गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणं मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्यावर मुंबईमधील वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे. गाण्यात काही ठिकाणी मुक्ता फोटोग्राफी करताना दिसत असून अनेक सुंदर क्षण ती आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतेय. यातूनच आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा असतो, असा संदेश या गाण्यातून मिळत आहे. ललित आणि मुक्ताची लोकप्रियता बघता हे गाणं सार्वजनिक ठिकाणी चित्रित करणे म्हणजे एक आव्हानच होते. तरीही मुक्ता आणि ललितने याठिकाणी धमाल, मज्जा मस्ती करत या गाण्याचे चित्रीकरण एका दिवसात केले.
मंदार चोळकर यांच्या अर्थपूर्ण शब्दांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून, रोहन प्रधान यांनी स्वरबद्ध केले आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका असून तृप्ती खामकर, सतीश आळेकर सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसतील. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट निश्चितच उद्याचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस मनमुराद जगायला शिकवणारा असेल यात शंका नाही. येत्या १९ जुलै रोजी ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.