Marathi News

YAAR DOSTI – यारी दोस्तीच्या सिनेमात झालीl ‘गणू’ ची एण्ट्री

मित्र…! केवळ दोन अक्षरांत तयार झालेल्या या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे,  गरजेच्यावेळी आपण हक्काने ज्या व्यक्तीकडे मदतीची अपेक्षा करतो, तो पाठीराखा म्हणजेच मित्र! आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकांचे विघ्न दूर करणारा ‘विघ्नहर्ता’ हा देखील खऱ्या मित्रांच्या यादीत मोडतो. आयुष्याच्या वाटेवर दिशादर्शक ठरणारा हा ‘देव’ मित्र प्रत्येकांच्या अंतर्मनात दडलेला असतो. असा हा ‘देव’ म्हणजेच गणपती बाप्पा उर्फ ‘गणू’ ने नुकतीच ‘यारी दोस्ती’ या आगामी सिनेमात एण्ट्री केली आहे. मैत्रीची परिभाषा मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीमने ‘गणू’ या नव्या मित्राचे नुकत्याच एका कार्यक्रमात ढोलताशाच्या गजरात स्वागत केले. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळी येथील प्रशस्त  एन.एस.सी.आयमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘यारी दोस्ती’ सिनेमातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचा माहोल आणि जल्लोष या कार्यक्रमात पाहायला मिळाला. आराध्याच्या खिदमतीस लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तजवीज या समारंभात करण्यात आली होती. फुलांची आरास, अत्तरांचा सुगंध आणि रांगोळी अशा प्रसन्न वातावरणात ‘गणू’ चे स्वागत करण्यात आले. सोबतीला आदर्श शिंदे यांच्या शाही आवाजातले ‘बाप्पा बाप्पा…’ या गाण्याने कार्यक्रमात आणखीनच रंग भरला. सिनेमातील गटर, नाला, लाडू आणि वन प्लस वन या मित्रांनी त्यांच्या पाचव्या मित्राचे भन्नाटरित्या स्वागत केले. या चौघांनी मिळून  चिकन मातीची गणेश मूर्ती बनवत ‘गणू’ ला लोकांसमोर आणले.
शांतनू अनंत तांबे लिखित आणि दिग्दर्शित ‘यारी दोस्ती’ सिनेमा किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित आहे.  पॅशनवल्ड एंटरटेनमेंटस् ची निर्मिती असलेल्या या सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप हा मुख्य भूमिकेत आहे. तर ‘माझी शाळा’ या चित्रपटातून झळकलेला आकाश वाघमोडे याच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. आशिष गाडे, सुमित भोकसे हे कलाकार पदार्पणास सज्ज आहे. यांच्यासोबतच या सिनेमात संदीप गायकवाड, मिताली मयेकर, नम्रता जाधव, श्रेयस राजे, निशा परुळेकर, अशोक पावडे, जनार्दन सिंग , मनीष शिंदे आणि मनीषा केळकर यांच्यादेखील ठळक भूमिका पहायला मिळणार आहेत. हा सिनेमा १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. चार मित्रांची मैत्री दाखवणाऱ्या या सिनेमामध्ये ‘गणू’ काय धम्माल करतो ते सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेलच.

Related Articles

Leave a Reply

Back to top button