आई आणि मुलीची भावनिक ‘सोबत’


ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ हा चित्रपट येत्या २४ मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील ‘तुझ्या सोबतीला’ हे गाणं नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. मुलीचा जन्म हा तिच्या आईसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा हा क्षण अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय असतो. हेच आई आणि मुलीचे हळुवार नाते एका अदृश्य धाग्याने बांधलेले असते. या अनमोल नात्यावर भाष्य करणारे ‘तुझ्या सोबतीला’ हे गाणं आंतराष्ट्रीय मातृ दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आले असून आई तिच्या पिल्लांना जीवनाकडे आशावादी नजरेतून पाहण्याची शिकवण देताना दिसत आहे. कितीही दाट अंधार असला तरी आशेचा किरण उगवणारच, असा सकारात्मक संदेश गाण्यातून मिळत आहे. तर गाण्याच्या उत्तरार्धात मुलगी आईला हळवी साद घालून, तिचे प्रेम हे किती अमूल्य आणि न विसरता येणारे आहे हे सांगत आहे. या भावनिक गाण्याला आनंदी जोशी हिने स्वरबद्ध केले असून, नवल शास्त्री यांनी संगीतबद्ध केले आहे तर मंदार चोळकर यांनी अगदी समर्पक शब्दांत आई आणि मुलीचे नाते मांडले आहे.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.