Marathi News

‘मिस यु मिस’ अश्विनी एकबोटेंना समर्पित

miss you miss

शाम निंबाळकर दिग्दर्शित ‘मिस यु मिस’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून मोहन जोशी आणि अश्विनी एकबोटे यांच्यासोबतच या पोस्टरमध्ये भाग्येश देसाई, तेजस्वी पाटीलही दिसत आहे. मिस यु मिस’ सिनेमाचे दुसरे पोस्टर सिनेमाच्या टीमने अश्विनीजींना समर्पित करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

मराठी, हिंदी सिने आणि नाट्यसृष्टीत दर्जेदार काम केलेल्या आणि अतिशय नावाजलेल्या अश्विनी एकबोटे यांचा ‘मिस यु मिस’ हा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटात अश्विनी एकबोटे यांनी तेजस्वी पाटील म्हणजेच मुख्य नायिकेच्या आईची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे शीर्षक ‘मिस यु मिस’ हे नेमके अश्विनी एकबोटेंसाठीच आहे की, दुसऱ्या कोणासाठी? याची उत्सुकता सर्वांनाच लागली असली तरी हे बघण्यासाठी आपल्याला चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल. अश्विनी एकबोटे यांनी चित्रपट , मालिका, नाटक, नृत्य अशा सर्व क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला, इतकंच नव्हे तर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा अनेक उत्कृष्ठ भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शक शाम निंबाळकर सांगतात, ” ‘मिस यु मिस’ चित्रपटाच्या सेटवर अश्विनी एकबोटे यांनी मला वचन दिले होते की, त्या माझ्या पुढच्या चित्रपटातही नक्की काम करतील. त्यावेळेस त्या म्हणाल्या होत्या की, “जेव्हा तुम्ही पुढचा सिनेमा घोषित कराल, त्यात मला एक भूमिका राखूनच ठेवा.” मात्र हे वचन अर्धवटच राहिले. पण म्हणतात ना ‘शो मस्ट गो ऑन’ आम्ही ‘मिस यु मिस’ हा चित्रपट अश्विनी एकबोटे यांना समर्पित करत आहोत. “

सुनील रघुनाथ महाडिक, क्षमा हिप्परगेकर आणि रोहनदीप सिंग यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर, जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, ग्रे कॅट प्रोडक्शन, आर. एस. महाडिक प्रोडक्शन आणि क्षमा एंटरटेनमेंट निर्मित ‘मिस यु मिस’ या चित्रपटामध्ये मोहन जोशी, तेजस्वी पाटील, भाग्येश देसाई आणि किशोर नांदोस्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button