Marathi News

गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या आणि सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित

गेल्या काही वर्षांमध्ये गाजलेले मराठी चित्रपट दिल्यानंतर निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार हे ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’, गोविंद उभे, एन अनुपमा आणि कांचन पाटील यांच्याबरोबरच्या भागीदारीतून ‘बोनस’ हा आणखी एक चित्रपट रुपेरी पडद्यावर सादर करायला सज्ज झाले आहेत. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि ‘जीसिम्स’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले असून या चित्रपटात मराठीतील ग्लॅमरस कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे मध्यवर्ती भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर आज प्रकाशीत करण्यात आले.

चित्रपटाच्या आज प्रकाशित झालेल्या पोस्टरवरून या चित्रपटाकडून काय अपेक्षित केले जाऊ शकते, याचा आडाखा बांधता येतो. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे कलाकार या चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेत असून हा चित्रपट रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. हे दोघेही या पार्श्वभूमीवर अगदी रोमँटीक अशा पोजमध्ये उभे आहेत. त्यातही वेगळी भासते ती गश्मीरच्या हातातील सूटकेस. या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्याशिवाय अत्यंत ग्लॅमरस अशी गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत असल्यानेही या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

‘बोनस– अॅवॉर्ड फॉर ऑडेसिटी’ या चित्रपटाची संपूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चा आहे ती या चित्रपटाची कथा आणि त्यातील कलाकारांमुळे. गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. देऊळबंद, कान्हा, वन वे टीकेट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले.
पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वात सुंदर अशा नायिकांपैकी एक आहे. तिच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. त्यांत दगडी चाळ, वृदांवन, पोश्टरबॉइज, लपाछपी, जंगली या चित्रपटांचा समावेश असून त्यांतील तिच्या मध्यवर्ती भूमिका गाजल्या आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे याने केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे.

सौरभ भावे म्हणतात, “बोनस म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नशिबात असलेली अधिकची गोष्ट. त्यात मग पैसा, आनंद आणि सुख या गोष्टींचा समावेश होतो. पण दुर्दैवाने काहींना हे भाग्य लाभते आणि त्यांच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी येतात तर काहींना यातील काहीच मिळत नाही. ‘बोनस’चा प्रयत्न या दोन्हींना एकत्र आणण्याचा आहे. ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ यांची ही दोन भिन्न जगे आहेत.” हे पुढे म्हणतात की, बोनस ही एका अशा मुलाचा आनंदप्रवास आहे की आपल्या वाट्याचे चांगले प्रसंग जगाबरोबर शेअर करताना त्याचे आयुष्य बदलून जाते आणि त्याच्या धारणाही संपूर्णपणे बदलून जातात. ही कथा त्याच्या वयात येण्याची आहे, ते म्हणतात.

“चित्रपटाच्या नावावरून ध्वनीत होते त्याप्रमाणे ही कथा धैर्य आणि धाडसाची तसेच धुंडाळलेल्या वेगळ्या पायवाटेची आहे. आम्ही याआधीच्या चित्रपटांमधून भक्कम कथा आणि उत्तम कलाकारांची जी परंपरा निर्माण केली आहे, ती या चित्रपटामधून अधोरेखित होईल,” असे उद्गार ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार यांनी काढले.

‘जीसिम्स’ ही मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून तिने याआधी फुगे, तुला कळणार नाही, रणांगण, विकी वेलिंगकर अशा गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. भिकारी यांसारख्या काही चित्रपटांची प्रस्तुती कंपनीने केली आहे. ‘जीसिम्स’ ही स्टुडीओ क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक आघाडीची कंपनी आहे. ती चित्रपट निर्मिती आणि सादरीकरण, टीव्ही निर्मिती, प्रज्ञा व्यवस्थापन, चित्रपट विपणन आणि प्रसार व उपग्रह समूहव्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button