महिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर !
८ मार्च, जागतिक महिला दिन! स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा हा दिवस. या दिनाचे औचित्य साधून इतिहासातल्या एका रणरागिणीवर आधारित हिरकणी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठी करणार आहे. आपल्या तान्ह्या बाळाच्या ओढीने व्याकुळलेल्या हिरकणीच्या शौर्याची ही गाथा. आपल्या बाळासाठी रायगडाचा अतिकठीण कडा उतरणारी हिरकणी ध्येयाने झपाटलेल्या स्त्रीशक्तीचं नेतृत्व करते. आज घर आणि करिअर सांभाळणारी प्रत्येक स्त्री या हिरकणीइतकीच सामर्थ्यवान आहे.
आई, मुलगी, बहीण, पत्नी अशा कैक भूमिका साकारणारी स्त्री ही स्वयंसिद्धा आहे, ‘ती’च्या असण्याने जग समृद्ध आहे. स्त्री ही आदिमाता आहे, जननी आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि सर्व क्षेत्रात नाव कमवतायत. चूल आणि मूल या चौकटीतून स्वतःला बाहेर काढून घराबरोबरच स्वतःची ओळख जपणारी स्त्री ही आजच्या काळातील खरी हिरकणी आहे.
घरी भुकेलेल्या आपल्या तान्ह्या बाळासाठी हिरकणी आपल्या जिवाची पर्वा न करता रायगडाचा रौद्र कडा उतरली होती. आपल्या बाळासाठी हिरकणीने दाखवलेल्या या सामर्थ्याची दखल खुद्द छत्रपती शिवाजीमहाराजांनी घेतली आणि तिच्या शौर्याला सलाम म्हणून त्या कड्याच्या जागी बांधलेल्या बुरुजाला ‘हिरकणी बुरूज’ हे नाव दिले. इतिहासातल्या या घटनेवर आधारित चित्रपट हिरकणी. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हिरकणीची भूमिका साकारली आहे, तर प्रसाद ओक आणि अमित खेडेकर हेही मुख्य भूमिकेत आहेत. प्रसाद ओक यांनी अभिनयाबरोबरच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातील ही कणखर आई प्रेक्षकांसमोर आली.
सोनी मराठी वाहिनीने देखील आपल्या मालिकांमधून स्त्रीची कणखर बाजू दाखवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. सोनी मराठी वाहिनी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या मालिकांमधून स्त्रियांना मानवंदना देत असते. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जिजामाता असु दे किंवा स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई सोनी मराठी वाहिनीच्या मालिकांनी सतत स्त्री शक्तीला महत्व दिलं आहे.
अशा स्त्रीशक्तीचा जागर आपणही करू या सोनी मराठीच्या साथीने. तेव्हा या स्त्रीसामर्थ्याचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या ‘हिरकणी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर नक्की पाहा ‘महिला दिन विशेष’ ८ मार्च रोजी दु. १ वाजता आणि संध्या. ७ वाजता, फक्त सोनी मराठीवर.