Marathi News

कलाकारांच्या जादुई आवाजांद्वारे झाले ‘प्रभो शिवाजी राजा’तील पात्र बोलते

Umesh Kamat
Umesh Kamat

एखादी नवीन कलाकृती लोकांसमोर आणायची असेल तर त्यासाठी पुष्कळ अभ्यासाची गरज असते. खास करून जर ती कलाकृती अॅनिमेशनरुपात सादर करायची असेल तर, अनेक बारकावेदेखील लक्षात घ्यावे लागतात. शिवरायांचा जीवनचरित्र मांडणारा आगामी ‘प्रभो शिवाजी राजा’ हा सचेतनपट देखील अश्या अनेक बारकाव्यांतून सादर झाला आहे. दिग्दर्शक निलेश मुळे यांच्या कौशल्यातून साकारलेल्या या शिवचरीत्रातील अॅनिमेटेड पात्र बोलकी करण्यासाठी दिग्गज कलाकारांच्या जादुई आवाजांनी महत्वाची भूमिका निभावली आहे.

अॅनिमेशन चित्रपटात पात्रांना बोलके करणे महत्वाचे असते. त्यासाठी सदर पात्राचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व लक्षात घेऊन आवाज दिला जातो. म्हणून, या सिनेमातदेखील पात्रांचा आवाज हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता. शिवाजी महाराजांच्या काळातील पात्रांना आवाज देण्यासाठी, त्याचा बारकाईने अभ्यास करून, त्यांना साजेल अश्या आवाजांची निवड यात करण्यात आली आहे. ज्यात शिवाजी महाराजांना मराठी अभिनेता उमेश कामत याचा आवाज असून, धर्मेंद्र गोहिल यांचादेखील आवाज लाभला आहे. शिवाय शहाजी महाराजांना अविनाश नारकर यांनी आवाज दिला आहे. तसेच औरंजेबला जयंत घाटे आणि समय ठक्कर, अफजल खानाला निनाद काळे, फाजल खानला कुशल बद्रिके, सिद्धी जोहरला सुहास कापसे, जिजाऊंना उज्वला जोग, बाजी प्रभूंना श्रीरंग देशमुख(लाला), राजे जयसिंगना उदय सबनीस, बडी बेगमना सुषमा सावरकर यांनी आवाज दिला आहे. या सिनेमाचे निवेदन सचिन खेडेकर आणि सप्तश्री घोष यांनी मिळून केले आहे.

शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास मांडणारा हा अॅनिमेशनपट  गणराज असोसिएट्स प्रस्तूत तसेच इन्फिनिटी व्हीज्युअल आणि मीफॅक यांचीनिर्मिती आहे, निलेश मुळे दिग्दर्शित हा सिनेमा येत्या १६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button