हंसराज आणि आकाश झाले कुलूपबंद !
मित्र म्हणजे असा जोडीदार की, ज्याला आपण कोणत्याही वेळी हक्काने त्रास देऊ शकतो. त्याच्याशी वादविवाद करू शकतो, मैत्रीत जेवढी आपुलकी, काळजी असते तेवढीच भांडणे देखील असतात…आणि त्यामुळेच ‘मैत्रीसाठी काहीही..
सिनेमातील गटर- नाला या भूमिकेला वास्तव्यात आणण्यासाठी दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे यांनी हंसराज-आकाशची मैत्री जुळून आणण्यास भन्नाट शक्कल लढवली होती. हंसराज मूळचा बीड तर आकाश पुण्याचा असल्याकारणामुळे ‘यारी दोस्ती’ या सिनेमाच्या निमित्ताने ही दोघे प्रथमच एकमेकांसमोर आली होती. सिनेमातील त्यांची मैत्री नैसर्गिक वाटावी म्हणून, सर्वप्रथम या दोघांची रिअल लाईफमध्ये मैत्री होणे गरजेची होती. त्यामुळे दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे यांनी ‘यारी दोस्ती’ सिनेमाच्या चित्रीकरणापूर्वी हंसराज आणि आकाशचा एकत्र वर्कशॉप घेतला. या दोघांना मुंबईत एका खोलीत तब्बल १० दिवस एकटं ठेवण्यात आलं होत. हंसराज आणि आकाशने या १० दिवसात एकमेकांना चांगलीच साथ दिली. बाहेरच्या जगापासून दूर अशा या विश्वात या दोघांची चांगलीच गट्टी जमली. विविध प्रांतातून आल्यामुळे या दोघांची बोलीभाषा आणि राहणीमानात भरपूर फरक होता, मात्र इतकेदिवस एकत्र राहिल्याने त्यांच्यातली ही विविधतेची पोकळी भरून निघाली. अशाप्रकारे शांतनू तांबे यांनी घेतलेला हा वर्कशॉप अपेक्षेहून अधिक यशस्वी झाल्याने ‘यारी दोस्ती’ च्या टीमने देखील त्यांचे भरभरून कौतुक केले. सिनेमाच्या प्रमुख भूमिकांना न्याय देण्यासाठी शांतनूच्या या दूरदृष्टीकोणामुळेच ‘गटर- नाला’ ही दोन आदर्श मित्र सिनेमात दाखल झाली. हा सिनेमा चार मित्रांवर आधारित असल्यामुळे त्यात या दोघांबरोबरच आशिष गाडे आणि सुमित भोकसे यांची देखील मुख्य भूमिका असणार आहे. शिवाय संदीप गायकवाड, मिताली मयेकर, नम्रता जाधव, श्रेयस राजे, निशा परुळेकर, अशोक पावडे, जनार्दन सिंग, मनीष शिंदे यांच्यादेखील ठळक भूमिका पहायला मिळणार असून ग्लॅमरर्स अभिनेत्री मनीषा केळकर विशेष भूमिकेत दिसेल.
किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेला हा सिनेमा १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट्स निर्मित हा सिनेमा प्रत्येकाला आपल्या खास मित्राची आठवण करून देणारा ठरेल, यात शंका नाही.