सुबोध-श्रुतीचे ‘शुभ लग्न सावधान’
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे, पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच पोस्टर लाँँच करण्यात आले. ‘शुभ लग्न सावधान’ असे या सिनेमाचे शीर्षक लक्षात घेता, हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित असल्याचा अंदाज येतो. दुबईत चित्रीकरण करण्यात आलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध आणि श्रुती झळकत असून, या दोघांची सुंदर प्रेमकहाणी यात दाखवली जाणार असल्याची जाणीवदेखील होते.
पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेला हा कौटुंबिक सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांना यात आशयघन मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर एकत्र येत असलेल्या सुबोध-श्रुतीच्या चाहत्यांसाठी ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा खूप खास ठरणार आहे, हे निश्चित !