व्हेंटीलेटर चित्रपटाचा टीझर लाँच
पर्पल पेबल पिक्चर्स यांच्या व्हेंटीलेटर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर लाँच करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळी एकाच पडद्यावर पाहण्याची संधी या चित्रपटातून मिळणार, ही मंडळी कोण असतील हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते, अखेर या गोष्टीवरून पडदा उठलेला आहे. निखिल रत्नपारखी, राहुल सोलापूरकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अच्युत पोद्दार, विजू खोटे, सुलभा आर्या, स्वाती चिटणीस या सगळ्यांबरोबरच तब्बल 18 वर्षांनी आशुतोष गोवारिकर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत एक अभिनेता म्हणून पदार्पण करत आहेत.
“आमची मेहनत अखेर फळाला आली असून…या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. आम्ही हा चित्रपट बनवताना लुटलेली मजा प्रेक्षक नक्कीच अनुभवतील,” असा विश्वास दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी दाखवला आहे. दरम्यान या चित्रपटातील कलाकारांविषयी बोलताना, “माझ्या चित्रपटातील पात्र खरी वाटावी आणि लोकांपर्यंत ती सहज पोहोचावी या उद्देशाने सगळ्याच पात्रांची निवड केल्याचे, दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी म्हटले तर आशुतोषची अभिनय शैली 18 वर्षांनी पुन्हा अनुभवणे प्रेक्षकांना सुखावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अशी ही दिग्दर्शक राजेश मापुसकर यांची फौज पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओ प्रस्तुत व्हेंटीलेटर या चित्रपटातून येत्या 4 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहे.