विद्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले – सई ताम्हणकर

रविवारी झालेल्या सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन सशक्त अभिनेत्रींना एकत्र पाहण्याचा योग उपस्थितांना आला. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेत्री सई ताम्हणकर ह्या सोहळ्यामध्ये एकत्र आलेलं पाहणं, ह्या दोघींच्याही चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच होती.
ह्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनी सांगितलं की, “खरं तर दोन ‘उलाहलाह गर्ल्स’च एकत्र आल्या असं म्हणा ना… विद्या बालन जशी हॉट, सेन्शअस आणि तितकीच संवेदनशील अभिनेत्री आहे, तशीच सईचीही प्रतिमा आहे. ह्या दोघींनीही आपल्या चित्रपटांच्या निवडीने आणि यशस्वी चित्रपट कारकिर्दीव्दारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ‘उलाहलाह’ म्हणायला भाग पाडलंय. त्यामूळेच ह्या अवॉर्ड नाइटला उपस्थित असलेल्या चित्रपट रसिकांसाठी हा दुग्धशर्करा योग होता.”
सई ताम्हणकरला ह्या भेटीबद्दल विचारल्यावर सई म्हणते, “मी खरं तर विद्याला पहिल्यांदाच भेटले. पण तिच्या नजरेत माझ्याशी बोलताना तिच्या डोळ्यांत असलेला परिचयाचा भाव, तिने माझे चित्रपट पाहिले असल्याचा विश्वास देऊन गेला. आणि हे माझ्यासाठी कोणत्याही क़म्पिलिमेंटपेक्षा पुरेसे आहे. विद्या बालन सशक्त महिलेचे प्रतिक आहे. आणि तिला भेटताक्षणीच तिच्या व्यक्तिमत्वाने तुम्ही भारावून जाता, ह्याचे प्रत्यंतर मला आमच्या भेटीने झाले. आणि ह्याविषयी मी तिच्याशी बोलले सुध्दा.”
पुरस्कार सोहळ्यात एकत्र आलेल्या ह्या दोन अभिनेत्री आता ऑनस्क्रिनही एकत्र याव्यात अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त होतेय.




Leave a Reply
You must be logged in to post a comment.