Marathi News

विकी कौशलने रिलीज केले ‘हिरकणी’ चित्रपटातील हिरा-जिवाच्या नात्यावर आधारित “जगनं हे न्यारं झालं जी” हे सुंदर गाणं

 Hirkani Song
Hirkani Song

सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपले बाळ घरी एकटे आहे, भुकेले आहे या विचाराने व्याकूळ झालेली आई म्हणजे हिरकणीची झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली. आता प्रेक्षकांची माय माऊली हिरकणी उर्फ हिराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि प्रेमळ अशा व्यक्तिरेखेसोबत ओळख होणार आहे ज्याच्यावर हिराचा जीव जडलाय. हिराचं ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती म्हणजे जीवा. ‘हिरकणी’ चित्रपटात जीवा या व्यक्तिरेखेची भूमिका अभिनेता अमित खेडेकर याने साकारली आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमित यांची ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे.

नुकतेच, या चित्रपटातील सोनाली आणि अमित या नव्या जोडीवर आणि त्यांच्या प्रेमकथेवर आधारित गाणं सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले आहे. ‘जगनं हे न्यारं झालं जी’ हे या गाण्याचे शीर्षक आहे. या गाण्याचे बोल संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिले आहे. अगदी सहज-सोप्या शब्दरचनेने देखील प्रेम गीत तयार होऊ शकते आणि ते इतरांना देखील या गाण्याच्या प्रेमात पाडू शकते अशा प्रकारे हे गाणे बनले आहे. ‘जगनं हे न्यारं झालं जी’ या सुरेल प्रेम गीताला अमितराज यांनी संगीतही दिले आहे आणि त्यांनी हे गाणं गायले देखील आहे, तसेच गायिका मधुरा कुंभार यांनी अमितराज यांना गाण्यात साथ दिली आहे.

या गाण्याशी संबंधित आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे अभिनेता विकी कौशलने हे गाणं ट्विटरवरुन रिलीझ केले आणि त्याने हिरकणी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा ही दिल्या.

शिवराज्याभिषेक गीत, मोशन पोस्टर, टीझर या माध्यमांतून हिरकणी चित्रपटाची झलक प्रेक्षकांपर्यंत पोहचली आणि आता हिरा-जीवाचं प्रेम गीत ‘जगनं हे न्यारं झालं जी’ प्रेक्षकांच्या मनात प्रेमाची भावना जागवण्यासाठी सज्ज झाले आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’ चित्रपटाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button