Marathi News
‘बॉईज-2 ‘च्या ‘स्वाती डॉर्लिंग’ची होतेय सर्वत्र चर्चा
बॉईज रिलीज झाल्यावर सर्वत्र त्यातल्या मुख्य भूमिकेत असलेल्या मुलांची चर्चा होती. पण बॉईज-2 रिलीज झाल्यावर बॉईजपेक्षा जास्त पॉप्युलर त्यातली ‘स्वाती डॉर्लिंग’च झालेली दिसतेय.
‘स्वाती डॉर्लिंग’ची सिनेमात जेव्हा जेव्हा एन्ट्री होते. तेव्हा थिएटरमध्ये सध्या टाळ्या-शिट्या ऐकायला येतायत. शिवाय ‘स्वाती डॉर्लिंग’चे ‘नरू तुझं माझ्यावर प्रेमच नाही’, ‘वळण स्वभावाला नसलं तरीही शरीराला असलं पाहिजे’, असे डायलॉग सध्या तरूणाईला खूप आवडताना दिसतायत.
सूत्रांनूसार, स्वातीचा सिनेमात उल्लेख बदामाची राणी असाही झालाय. आणि सिनेमा रिलीज झाल्यावर एक्यांवर भारी पडणारी ती खरंच बदामाची राणी ठरलीय. तिच्या बोल्ड संवादांनी आणि दिलखेचक अदांमूळे मल्ल्टिस्टारर सिनेमातही ती सर्वांच्या लक्षात राहतेय.
अभिनेत्री शुभांगी तांबाळे ह्याविषयी म्हणते, “हा सिनेमा करताना एवढ्या मोठ्या लोकप्रिय सिनेमाच्या सिक्वलचा आपण एक भाग होतो आहोत. आणि आपली लक्षात राहणारी भूमिका आहे, एवढंच मी पाहिलं होतं. पण माझी भूमिका लोकांना एवढी आवडेल असं खरं तर वाटलं नव्हतं. सध्या महाराष्ट्रभरातून मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. कधी माझा नंबर शोधून लोक मला आवर्जून फोन करतात. तर काही लोकं सोशल मीडियावरून मला भरभरून शुभेच्छा देतायत. आजकाल मी जिथे जाईन तिथे फक्त माझ्यावर कौतुकाचाच वर्षाव होतोय. त्यामूळे अर्थातच मला खूप आनंद होतोय. “