Marathi News
बावन्न भूमिकांचा अवलिया

२२ सप्टेंबर २०१६: रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपटांत आपली वेगळी ओळख निर्माण केलेला हृषिकेश जोशी हा अवलिया अभिनेता प्रेक्षकांना सरप्राइज देण्यासाठी सज्ज आहे.
स्टार प्रवाहवर सुरू होत असलेल्या विकता का उत्तर या नव्या कोऱ्या गेम शोमध्ये थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल ५२ भूमिकांमध्ये दिसणार आहे.
स्टार अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेला विकता का उत्तर हा गेम शो 7 ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर दाखल होत आहे. प्रश्नोत्तराच्या खरेदी विक्रीवर आधारित असलेल्या विकता का उत्तर या शोच्या टीजर्सनी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. अनोख्या संकल्पनेवरच्या या गेम शोमध्ये स्पर्धकांची बुद्धिमत्ता आणि व्यवहारकौशल्य पणाला लागणार आहे. मात्र, हा गेम शो रंजकदार करण्याचं काम हृषिकेश जोशी करणार आहे. एका अभिनेत्यानं एकाच कार्यक्रमात इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याची ही मराठी टेलिव्हिजनवरील बहुधा पहिलीच वेळ असावी. विकता का उत्तरमध्ये ५२ भूमिका साकारत असल्याच्या बातमीला हृषिकेशनं दुजोरा दिला. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या शोमध्ये माझ्या एकूण बावन्न भूमिका असून, या भूमिकांबद्दल मीसुद्धा प्रेक्षकांइतकचा उत्सुक आहे एवढंच सध्या सांगू शकतो, असं हृषिकेश म्हणाला.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.