दुष्काळग्रस्त भागात पार पडले ‘पिप्सी’ चे शुटींग
‘अ बॉटल फूल ऑफ होप’ अशी टॅगलाईन असणारा ‘पिप्सी’ हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ हा सिनेमा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी ‘पिप्सी’ सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात एन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाका सोसावा लागला होता.
पाण्याची कमतरता, चाहुबाजूस केवळ सुकलेले रान आणि ३५ डिगरीहून अधिक तापमान असणाऱ्या या भागात बालकलाकारांसोबत चित्रीकरण करणे आव्हानास्पद होते. कारण प्रचंड उन्हामुळे मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशीच्या घशाला चित्रीकरणादरम्यान सतत कोरड पडत होती. तसेच अतिउष्णतेमुळे त्यांची तब्येतदेखील बिघडण्याची दाट शक्यता होती. मात्र, या दोघांनी या खडतर वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर पडू न देता, आपापला अभिनय चोख बजावला. विशेष म्हणजे, त्यानंतर पार पडलेल्या ५५ व्या राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘पिप्सी’ सिनेमातील भूमिकेसाठी मैथिलीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारदेखील देण्यात आला. शिवाय साहिल जोशी यानेदेखील ‘रिंगण’ सिनेमासाठी २०१६ सालच्या ५३ व्या राज्यपुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा सन्मान मिळवला असल्यामुळे, ‘पिप्सी’ सिनेमातील त्याच्या कसदार अभिनयावर दुष्काळी वातावरणाचा तसूभरही परिणाम झाला नाही. अश्याप्रकारे राज्यपुरस्कार विजेते असलेल्या दोन बालकलाकारांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना दर्जेदार अभिनयाची अनुभूती देणारा ठरणार आहे. लहान मुलांच्या निरागस डोळ्यातून सादर होत असलेली ‘पिप्सी’ ची ही बाटली प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच वास्तविकतेकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोनदेखील देऊन जाणार आहे, हे निश्चित !