जेव्हा वन वे तिकीटच्या कॅमे-यात सोनाली दिसते. …
सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोघी मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री एका सिनेमाच्या शूटच्या निमित्ताने आमने सामने आल्या. झालं असं की …. अमृता खानविलकरच्या ‘आगामी वन वे तिकीट’ या सिनेमाच शूटिंग क्रुझवर तसेच इटली, स्पेन आणि फ्रान्स या ठिकाणीही चित्रित करण्यात आलं आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे या सिनेमाच्या एका सीनचं चित्रीकरण चालू होतं. नेमकं त्याचवेळी कॅमे-याच्या फ्रेममध्ये एक ओळखीचा चेहरा दिसू लागला. हा चेहरा दुसरा तिसरा कोणाचा नसून सोनाली कुलकर्णीचा होता. सोनाली कुलकर्णी त्यावेळी स्पेनमध्ये स्वतःच्या कामानिमित्त आली होती. परक्या देशात आपली माणसं दिसल्यावर सोनालीला त्यांना भेटण्याचा मोह आवरला नाही.
यावेळी सोनालीने सिनेमाच्या टीम सोबत भरपूर दंगा मस्ती केली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेछाही दिल्या. क्रुझवर चित्रित करण्यात आलेला हा पहिलाच मराठी सिनेमा असून अमोल शेटगे यांनी सिनेमाच दिग्दर्शन केलं आहे. सचित पाटील, गश्मीर महाजनी, शशांक केतकर आणि नेहा महाजन यांच्यादेखील प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. मेकब्रँडच्या कोमल उनावणे या सिनेमाच्या निर्मात्या असून क्लिक फ्लिक फिल्म्सचे क्रिष्णानू मॉटी तर म्हाळसा एंटरटेनमेंटचे सुरेश पै ही दोघ सहनिर्माते आहेत. येत्या १० जून ला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.