Marathi News

जल्लोषात पार पडला ‘बंध नायलॉनचे’चा संगीतमय सोहळा

Band Nayche

जल्लोषात पार पडला ‘बंध नायलॉनचे’चा संगीतमय सोहळा ! गायकांच्या लाइव्ह परफॉर्मन्सने कार्यक्रमात आणली जान !

टेक्नोलॉजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव यावर भाष्य करणारा ‘बंध नायलॉनचे’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच २९ जानेवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नात्यांच्या भावविश्वावर भाष्य करणा-या या सिनेमाचा अंधेरी येथील ‘द क्लब’ मध्ये नुकताच धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा पार पडला. लॅविश वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात सिनेमातील स्टारकास्ट सोबतच सिनेवर्तुळातील अनेक स्टार चेह-यांनीदेखील उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात  ‘बंध नायलॉनचे’ या सिनेमातील गायक अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे आणि आदित्य पाटेकर यांनी आपापल्या गाण्याचं लाईव्ह सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली.

दिग्दर्शक जतिन वागळे तसेच लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित या त्रिकुटांनी स्वतः कार्यक्रमाची धुरा सांभाळत पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर सिनेमाचे निर्माते सुनिल चंद्रिका नायर यांच्या हस्ते ‘बंध नायलॉनचे’ या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सिनेमाच्या स्टारकास्टनेदेखील सिनेमातील भूमिकेविषयी आपले मत मांडले. या सिनेमात महत्वाची भूमिका असणारे महेश मांजरेकर यांनी आपल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितले की,  ‘ हा सिनेमा नावाजलेल्या एका एकांकिकेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाचा विषय मला खूप आवडला. तसेच जतिनने सिनेमाचे अप्रतिम दिग्दर्शन केले असून यात माझी एक वेगळी भूमिका आहे. माझा यात डबल रोल असून या सिनेमात एक ट्विस्ट आहे, त्या ट्विस्टचा मी एक महत्वाचा भाग आहे, याचा मला आनंद वाटतो, असे त्यांनी सांगितल. तसेच मेधा मांजरेकर यांनी आपल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितल की , ‘ सिनेमाच्या निमित्ताने मला प्रथमच महेश सोबत काम करण्याची संधी मिळाली असून या सिनेमाचा विषय वेगळा आहे, लोकांना हा सिनेमा खूप आवडेल अशी मी आशा करते’.

या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत असणा-या श्रुती मराठे यांनीदेखील आपल्या भूमिकेविषयी आपले मत मांडले. मी या सिनेमात सून, बायको आणि आई अशी तिहेरी भूमिका करत असून हा रोल माझ्यासाठी खूप  चॅलेन्जिंग होता. पण दिग्दर्शकांनी माझ्याकडून हा रोल अतिशय चांगल्यारीत्या करवून घेतला असल्याचे श्रुती म्हणाली. तर अभिनेता सुबोध भावे याने सिनेमातील कलाकारांसोबत काम करायला मजा आली असल्याचे सांगितले. ‘महेश आणि मेधा या दोन दिग्गज जोडीसोबत मला करण्याची संधी मिळाली. या सिनेमाचा विषय कौटुंबिक असून प्रत्येक घराघरात जे घडते तेच या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सुबोध यांनी  सांगितले.  त्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील  एवरग्रीन पर्सन सुनील बर्वे यांनीही सिनेमाविषयी आपले मत मांडत दिग्दर्शक जतिन सोबत पुन्हा काम करायला आवडेल अशी  इच्छा बोलून दाखवली. तसेच या सिनेमातून अवधूत, आदर्श, आदित्य, आणि मी (अमितराज) असा ‘अ’चा सुर जुळून आला असून, त्याद्वारे  प्रेक्षकांना गाण्यांचे विविध झोन ऐकायला मिळणार असल्याचे संगीतदिग्दर्शक अमितराज यांनी सांगितले.

> लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित लिखित ‘बंध नायलॉनचे’ या एकांकिकेवर आधारित हा सिनेमा आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेली ‘कुणीतरी’, ‘एक तारा’ आणि ‘उठे कल्लोळ कल्लोळ’ ही गाणी लोकांना खूप आवडतील यात शंका नाही.  मंदार चोळकर आणि सचिन पाठक या दोघांनी मिळून सिनेमाची गीते लिहिली आहेत. झिरो हिट्स बॅनरखाली ‘बंध नायलॉनचे’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून सीजी नायर आणि सुनील चंद्रिका नायर हे सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर,  सुबोध भावे, श्रुती मराठे, संजय नार्वेकर, सुनील बर्वे असे प्रसिद्ध चेहरे असून प्रांजल परब ही बालकलाकार सुद्धा  आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अशाप्रकारे उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि संगीत लाभलेला हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button