Marathi News
किशोर कदम प्रथमच विनोदी भूमिकेत
सामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या सिनेमात आपल्या अभिनयाचा वरचष्मा गाजवणारे किशोर कदम, पहिल्यांदाच ‘वाघेऱ्या’ या सिनेमाद्वारे विनोदी भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. ग्रामीण विनोदाची खुमासदार मेजवानी असलेल्या या सिनेमात किशोर कदम ‘वाघेऱ्या’ नामक वेड्या गावातले सरपंच साकारणार आहेत. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच सुपरहिट ‘बॉईज’ सिनेमाचे निर्माते असलेले सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे प्रस्तुत ‘वाघेऱ्या’ या धम्माल विनोदीपटात वेड्या ग्रामस्थांची मज्जा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
आतापर्यंत ग्रामीण जीवनातील मर्म आणि संघर्ष मांडणारे किशोर कदम ‘वाघेऱ्या’ या सिनेमातून ग्रामीण विनोद करताना दिसून येणार आहे. विशेष म्हणजे, नेहमी धोतर आणि फाटक्या अंगरख्यात दिसणा-या किशोर कदम यांना या सिनेमात प्रेक्षक पहिल्यांदाच सफारी सूटमध्ये वावरताना पाहणार आहेत. ‘हा एका वेगळ्याच धाटणीचा सिनेमा असून, मराठीत बऱ्याच वर्षांनी याप्रकारचा विनोदीपट प्रदर्शित होत आहे.
मराठीतील सर्व दिग्गज कलाकारांसोबत आणि माझ्या जुन्या मित्रांसोबत काम करताना खूप मज्जा आली’ असे किशोर कदम सांगतात.
समीर आशा पाटील दिग्दर्शित आणि लिखित ‘वाघेऱ्या’ सिनेमात किशोर कदमसह भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे मातब्बर कलाकारदेखील झळकणार आहेत. उन्हाळी सुट्टीत धम्माल उडवण्यास येत असलेला हा सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.