इम्तियाझ अली आणि फोटोकॉपी ….
सध्या सर्वत्र धूम आहे ती फोटोकॉपी या चित्रपटाची. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांना भरघोस प्रतिसाद मिळत असून, या सिनेमाला सोशल साईटवर कमालीचे लाईक्स मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत असलेल्या या सिनेमाला खुद्द इम्तियाज अली यांनी पसंतीची पावती दिली आहे. सोचा ना था , लव्ह आज कल , रॉकस्टार , तमाशा आणि जब वी मेट या बॉलिवूडच्या हिट सिनेमांची निर्मिती करणारे इम्तियाझ अली
यांनी हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ या आगामी मराठी सिनेमाला भरपूर शुभेच्छा दिल्या. त्यासाठी त्यांनी सिनेमातील कलाकार पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस यांच्यासोबत काढलेला सेल्फी सोशल साईटवर अपलोड केला. पर्ण- चेतन या सिनेमातील फ्रेश जोडीला भरपूर शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक करणारा संदेशदेखील त्यांनी प्रसिद्ध केला असल्याचे दिसून येतेय.
> विजय मौर्य दिग्दर्शित या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून या सिनेमात पर्ण दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच चेतन चिटणीस नावाचा गोंडस चेहरा यांमार्फत लोकांसमोर सादर होत आहे. या जोडीसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.