Marathi News

…अशी सुचली ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ ची कथा

Kulkarni Chaukatla Deshpande
Kulkarni Chaukatla Deshpande

स्त्रीला आयुष्यात मुलगी-आई-बहिण-मैत्रीण-पत्नी-सून या सर्व भूमिका जबाबदारीसह साकाराव्या लागतात. स्त्री म्हटलं की तिने सहन करायचं हे ठरलेलं असतं. पण प्रगतीशील देशाच्या स्त्रीया या त्यांच्या जबाबदा-या न झटकता स्वत:चं आयुष्य नव्याने जगण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक बुध्दिवान, सुंदर स्त्री गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमाच्या ट्रेलरमधून एका मध्यमवर्गीय बंडखोर बाईची बंडखोर गोष्टीची झलक दाखवण्यात आली. स्वतंत्र आयुष्य जगण्याची इच्छा मनात बाळगणारी स्त्री आणि बायको यांमध्ये अडकलेल्या आईची भूमिका सई ताम्हणकरने साकारली आहे.

बंडखोरी म्हणजे चंगळ वाद नव्हे, बंडखोरी जबादारी घेऊन येते. जबाबदार माणसं प्रगल्भ होतात, प्रत्येक घटनेला अनुभव म्हणून पाहतात. हा सिनेमा एक समृद्ध अनुभव देऊन जाईल.

सिनेमाची पन्नाशी गाठणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्यांच्या सिनेमांतून नेहमीच आजपासच्या गोष्टींमधून वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि या सिनेमाची कथा देखील त्यांच्या नजरेने टिपली आहे. या सिनेमाची कथा गजेंद्र अहिरे यांना कशी सुचली हा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच असणार. आणि याचे उत्तर गजेंद्र अहिरेंनी दिले आहे.

“माझ्या जवळच्या मैत्रिणी, मित्रांच्या बायका, ओळखीतील लोकं. तिशी ओलांडलेल्या स्त्रिया ज्यांची मुलं लहान आहेत यांच्यामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा होते, बोलणं होत. एकदा सहज त्यांच्याशी बोलता-बोलता त्यांचा बेसिक प्रॉब्लेम मला सारखा जाणवत होता ज्याच्याविषयी कोणीही मोकळेपणाने बोलत नव्हतं. या दरम्यान मला माझ्या सिनेमाची गोष्ट सापडली. ज्यांना या विषयावर व्यक्त व्हायचे असेल, स्वत:चे मुद्दे मांडायचे असतील तर या सिनेमाच्या निमित्ताने त्यांना एक आधार मिळेल”, असे गजेंद्र अहिरे यांनी सांगितले.

लग्न झालं, संसार झाला, मुलं झाली, मुलं शाळेतही जाऊ लागली, करियरची सुरुवात पण झाली… पण या आयुष्याच्या चक्रात आपण खरंच मनापासून खूष आणि समाधानी आहोत का? या चक्रात अडकलोय का? काही चुका झाल्या आहेत का? वय असं आहे की अजून खूप आयुष्य जगायचं बाकी आहे तर झालेल्या चुका सुधारणं शक्य आहे का? या कथेच्या निमित्ताने असे शेकडो प्रश्न गजेंद्र अहिरे यांना दिसत होते आणि या ही कथा उत्कृष्टपणे पडद्यावर मांडणा-या नायिकेचा चेहरा त्यांच्या मनात पक्का झाला आणि ती नायिका म्हणजे सई ताम्हणकर.

कथेतल्या नायिकेला तिचं आख्खं आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिने पेहराव बदलला, तिने घर बदललं, तिने नोकरी बदलली, तिने ऍटिट्युड बदलला, तिने नवरा बदलला, तिने मित्र बदलला, तिने तिचं जगणं बदललं पण तिचं जगणं बदललं का? भूमिका बदलत गेलेल्या भूमिकामागची भूमिका करणा-या सई ताम्हणकरला सिनेमाची कथा आवडली.

सिनेमात मांडण्यात आलेला मुद्दा गंभीर असला तरी तो कॉमेडी अंदाजात, खुसखुशीत पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बदलती लाईफस्टाईल, जगण्याचा दृष्टिकोन असणा-या या सिनेमात सईसोबत निखिल रत्नपारखी, राजेश श्रृंगारपुरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. उत्तम कलाकारांच्या अभिनयासह या सिनेमाला लेह लडाख सारखे सुंदर लोकेशन आणि एका पेक्षा एक उत्तम गाण्यांची जोड मिळाली आहे.

स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे. प्रशांत गोखले हे सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. येत्या २२ नोव्हेंबरला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button