‘विक्की वेलिंगकर’ चित्रपट ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार निर्मित व प्रणय चोकसी आणि ‘डान्सिंग शिवा’ प्रस्तुत तसेच सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटात मराठीतील अनेक मालिका आणि विविध नाटकांमधून अभिनय करणारा अभिनेता संग्राम समेळ एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आता लवकरच तो या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी संग्रामने त्याचे सिनेमातील पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. संग्राम समेळ पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णी बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
‘मला ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. संग्राम आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे, संग्राम यामध्ये विक्कीच्या मित्राची भूमिका साकारत आहे आणि तो एक हॅकर आहे. त्याची भूमिका ही मैत्रीसाठी जीवाला जीव लावणार असं हे पात्र आहे. मला संग्रामबरोबर काम करताना खूप मज्जा आली’ असे सोनाली कुलकर्णी सांगते.
अभिनेता संग्राम समेळ हा यापूर्वी उंडगा, ब्रेव्ह हार्ट, ललित २०५ यांसारख्या मालिकांमधून तसेच एकच प्याला, कुसुम मनोहर लेले यांसारख्या नवीन नाटकांमधून तसेच वर खाली दोन पाय या नाटकामधून संग्राम समेळ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, त्याचबरोबर स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत आहे. तसेच यांच्याबरोबर विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत.
सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.