Tu Jithe Me Thithe Song: फ्रेश जोडीचे फ्रेश गाणे तू जिथे मी तिथे

प्रेम… म्हणजे प्रत्येकाच्या मनात एका व्यक्तीसाठी असलेली विशेष भावना. प्रेमाच्या या गुलाबी रंगात न्हाऊन निघालेले अनेक हृदय आपल्याला पाहायला मिळतील. तारुण्याने बहरलेल्या या हृदयात जेव्हा प्रेमाची पालवी उमलते तेव्हा आयुष्य खूप सुंदर होते, म्हणूनच आयुष्यात प्रेम गरजेचे असते, प्रेमाची हीच परिभाषा आगामी ‘फोटोकॉपी’ या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतेच या सिनेमाचे ‘तू जिथे मी तिथे’ हे प्रेमगीत सोशल साईटवर प्रदर्शित करण्यात आले. अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला निलेश मोहरीर यांचे दिग्दर्शन लाभले असल्याकारणामुळे हे प्रेमगीत प्रेमीयुगुलांना पर्वणीच ठरणार आहे. शिवाय, स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल या दोन गोड गाळ्यांच्या जोडीने हे गाणे गायले आहे. पुण्यातील लवासा येथील प्रशस्त आणि अल्हादायी वातावरणात चित्रित केले गेलेल्या या गाण्याचा तजेला प्रेक्षकांना मदमस्त करणारा ठरत आहे. तसेच पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस या फ्रेश जोडींवर आधारित असलेले हे फ्रेश गाणे तरुणांईंना भुलावत आहे.
व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ हा सिनेमा तरुण मनाचे भावविश्व जपणारा सिनेमा आहे. या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत. पर्ण आणि चेतन या जोडीसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.