दाक्षिणात्य “आय” मुव्ही फेम कामराज चे मराठीत पदार्पण
नवीन वर्षात तुफान, धडाकेबाज आणि जोशपूर्ण असा “शिवा – एक युवा योद्धा” सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या १५ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लॉंच सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला. पत्रकारिता क्षेत्रातील वरिष्ठ मंडळी लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर आणि माझी सहेली मासिकाचे संपादक दीपक खेडकर, एसजीएस फिल्म्स् चे निर्माते व्ही डी शंकरन, डॉ. संजय मोरे आणि गणेश दारख, दिग्दर्शक विजय शिंदे, दमदार आणि कडक अंदाजात भेटीला येणारा शिवा म्हणजेच सिद्धांत मोरे, गीतकार बाबासाहेब सौदागर तसेच चित्रपटातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या ‘शिवा’ सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. खेळ आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आतापर्यंत बरेच लिखाण केलेले शिव छत्रपती पुरस्कार विजेते लेखक संजय मोरे यांनी अडीच वर्ष परिश्रम घेत या सिनेमाचे लेखन केले आहे.
डॉ. संजय मोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शिवा सिनेमाची निर्मिती एका सामाजिक जबाबदारीने केली आहे. आपल्या सभोवताली असलेल्या परिस्थितीचं चित्रण मनोरंजनाच्या माध्यमातून केलं आहे. सिनेमात शिवा ही प्रमुख भूमिका निभावणारा सिद्धांत मोरे म्हणतो, बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील माझे आदर्श आर्नोल्ड, रॉक यांना पाहिलं तर बॉडीबिल्डिंग प्रमाणे सिनेक्षेत्रातही त्यांची यशस्वी कारकीर्द ठरली आहे. त्यांना मिळालेलं चाहत्यांचं प्रेम माझ्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. शिवा या सिनेमाला देखील असाच उदंड प्रतिसाद मिळेल ही आशा. सिनेमात येण्यापूर्वी ‘सिनियर मिस्टर एशिया’ या जपानमध्ये झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘क्लासिक बॉडीबिल्डिंग’ गटात सगळ्यात तरुण भारतीय असलेल्या सिद्धांतने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ‘सिनिअर मिस्टर एशिया’ हा बहुमान पटकावला होता. ६ फूट १ इंच उंची असलेला, बलदंड भुजा, भरदार छाती, रुंद पाठ, पट पडलेल्या मांड्या, धाटधार पोटऱ्या असा अस्सल खेळाडू सिद्धांतचे या सिनेमाच्या माध्यमातून एक चॉकलेट बॉय म्हणून प्रथम पदार्पण होत आहे. त्याने या सिनेमासाठी तब्बल ४ वर्षे मेहनत घेतली आहे. यातील सर्व जीवघेणे स्टंट्स स्वतः दिले आहेत.
या सिनेमात एका अपंग व्यक्तीने निभावलेली मैत्रीची व्याख्या सांगणारी महत्वाची भूमिका पाहता ‘शिवा’चे वेगळेपण नक्की जाणवेल. ‘शिवा’ सिनेमाचा भन्नाट ट्रेलर आणि नादावणारी गाणी सिनेरसिकांना नक्कीच आवडतील अशी आहेत. या सिनेमात निव्वळ मनोरंजन नाही तर सामाजिक परिस्थितीचं भान ही राखलं गेलं आहे. दुष्काळात शेतकऱ्यांचे होणारे हाल आणि त्यावर शासनाकडून मदतीच्या नावाखाली केली जाणारी थट्टा सिनेमात नेमकेपणाने मांडली आहे. व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईला कोणताही उपदेशाचा डोस न देता तरुणांची नेमकी नस ओळखून सिनेमात या समस्येवर बोट ठेवलं गेलं आहे. अॅक्शन, रोमान्स, थिरकायला लावणारी गाणी असं एंटरटेनमेंटचं कम्प्लिट पॅकेज असलेला शिवा सिनेमा मनोरंजनाची उत्तम पर्वणी ठरणार आहे. एखाद्या हिंदी सिनेमाला लाजवेल असे सादरीकरण असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना अधिक भावेल असा आहे. अभिनेता सिद्धांत मोरे, तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे, बाबासाहेब सौदागर आणि दक्षिणेतील सुपरस्टार (“आय” सिनेमा फेम) कामराज ही कलाकार मंडळी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील गाणी सहज प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहेत.
संगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी सिनेमात एकूण ५ गाणी दिली आहेत. वेगवेगळ्या धाटणीची ही पाचही गाणी मनाचा ठाव घेणारी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचं ‘प्रलय भयंकर’ हे मराठीत गायलेलं इन्स्पिरेशनल सॉंग ऐकण्याचा योग येणार आहे. हे गाणं तरुणांपुरतच मर्यादित नसून प्रत्येक वयोगटातील श्रोत्याला भावणारं आहे. गायक सागर फडके यांच्या दमदार आवाजातील ‘खांद्याला खांदा लावून’ हे प्रेरणादायी गाणं देखील तितकंच जोशपूर्ण आहे. गायक रुपाली मोघे आणि सागर फडके यांच्या आवाजातील तुफान गाजेल असं ‘एन्जॉय करू’ हे झिंग चढवणारं आयटम सॉंग थिरकायला लावणारं आहे.
महाराष्ट्राचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर याच्या सुमधुर आवाजात ‘साजणी’ या मन मोहून टाकणाऱ्या प्रेमगीताने सिनेमात चारचाँद लावले आहेत. जीवनात चालणारा ऊन सावलीचा खेळ गायक कृष्णा बोंगाने याने त्याच्या आर्त आवाजात नेमकेपणाने सादर केला आहे. त्याने गायलेल्या ‘ऊन सावली’ या गाण्याचे बोल हे आयुष्यातील आव्हानात्मक परिस्थितीवर भाष्य करणारे असल्याने ते थेट काळजाला भिडतात. या सिनेमाची कथा शिवा (सिद्धांत मोरे) आणि त्याच्या एकंदर प्रवासाची आहे. शिवाच्या वडिलांनी दिलेली शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आचरणात आणत त्याने उत्तम माणूस आणि योद्धा बनून केलेली वाटचाल सिनेमात दाखविली आहे. नवीन वर्षातील ‘शिवा’ हा धमाकेदार सिनेमा येत्या १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी करेल अशी सिनेमाच्या टीमने आशा व्यक्त केली आहे.
Shiva Marathi Movie Trailer:
Saazni Marathi Movie Songs: